१७ गावात भरला बोगस विमा; महसूल क्षेत्रच नसल्याचे उघड
दोषींवर गुन्हा दाखल करा- खा. संजय जाधव
परभणी (Crop Insurance scam) : राज्यात तत्कालीन कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर बोगस पीक विमा भरण्यात आल्याचा आरोप आ. सुरेश धस यांनी केला. या बोगस पीक विमा घोटाळ्यात परभणी जिल्ह्यातील १७ गावांचा समावेश असून जवळपास अंदाजे ६५ कोटींचा हा अपहार असल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, सोनपेठ, पालम, जिंतूर या चार तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील आनंदनगर, जिंतूर तालुक्यातील आंगलगाव तांडा, केहाळतांडा, लिंबला, पोखर्णी तांडा, सावळी नगर, तेलवाडी, पालम तालुक्यातील मोजमाबाद तांडा, रामपुरी तांडा, सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा, कोथाळा तांडा, मनसीराम तांडा, रेवातांडा, सखाराम तांडा, सोनपेठ शहर, सोनपेठ (एम.सी.आय) तुकाई तांडा, या परिसरातील जमीनी दाखवून हा विमा भरण्यात आला. २०२४ – २५ साली ११ हजार २२१ शेतकर्यांच्या नावावर २६ हजार १४९ क्षेत्रावर हा विमा भरण्यात आला आहे.
हा विमा भरलेल्या गावात महसूल क्षेत्रच नसल्याची माहिती समोर आली आहे. मग हा (Crop Insurance scam) विमा भरताना बोगस कागदपत्रे लावण्यात आल्याचे समोर आले आहे. हा विमा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील लोकांच्या नावाने सर्वाधिक भरण्यात आला आहे. हा एकाच वर्षाचा घोटाळा समोर आला असून हा आकडा अंदाजे ६५ कोटींच्या जवळ असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या बोगस पीक विम्याची व्याप्ती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे.
दोषींवर गुन्हा दाखल करा- खा. संजय जाधव
परभणी जिल्ह्यात याच पध्दतीने मागील पाच वर्षांपासून पीक विमा बोगस भरला गेलेला आहे. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव समोर येत असले तरी परभणी जिल्ह्यातील त्यांच्या पक्षातील काही पदाधिकारी यामध्ये सहभागी असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पहिले (Crop Insurance scam) गुन्हा दाखल करुन तपास करावा, अशी मागणी खा. संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी केली.