Published on
:
04 Feb 2025, 11:48 pm
Updated on
:
04 Feb 2025, 11:48 pm
वॉशिंग्टन : कोरोना महामारी ओसरल्यानंतर अवघ्या जगानेच सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, कोरोनापश्चातच्या अनेक समस्या जगभरात पाहायला मिळत आहेत. अमेरिकेतील तरुणांमध्ये ‘कोव्हिड-19’ नंतरच्या काळात मृत्यूदर अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे एका संशोधनात आढळले आहे. ‘जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ने (जेएएमए) नेटवर्क ओपनमध्ये यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या संशोधकांनी 1999 ते 2023 या कालावधीत मरण पावलेल्या 25 ते 44 या वयोगटातील 33 लाख व्यक्तींच्या मृत्यूचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे.
तरुणांचा मृत्यूदर वाढला असतानाच त्यांच्या मृत्यूची कारणे एकमेकांपासून बरीच भिन्न आहेत. त्यामध्ये अमली पदार्थ व मद्यामुळे ओढवणारे मृत्यू, हृदयविकार, मधुमेह, साखरेचे वाढलेले प्रमाण, पक्षघात, उच्च रक्तदाब, अतिचरबी यासारख्या विविध कारणांबरोबरच वाढत्या अपघाती मृत्यूंचाही समावेश आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या सध्या होत असलेल्या परिणामांवर अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा’च्या संशोधकांनी या अभ्यासात सहभाग घेतला. कोरोना महामारीदरम्यान तरुणांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि महामारीनंतरही तो अपेक्षेपेक्षा जास्त राहिला आहे, असे संशोधकांना अभ्यासात आढळले. याचा परिणाम लोकसांख्यिकीवर होण्याची शक्यता आहे, असे संशोधकांनी नमूद केले.