Published on
:
05 Feb 2025, 2:21 am
Updated on
:
05 Feb 2025, 2:21 am
गडहिंग्लज ः राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत नव्याने तपासणी मोहीम करण्याचे आदेश दिले असून, यामध्ये अंगणवाडी सेविका, तसेच पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यावर ग्रामीण भागातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, एखाद्या कुटुंबाकडे व्यवसायाच्या गरजेसाठी चारचाकी वाहन असेल, तर त्याचे नाव योजनेतून बाद करण्यात येणार आहे; मग अनेक कुटुंबांतील सदस्यांकडे महागड्या दुचाकी असतील तर त्या राज्य शासनाला चालणार काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास कल्याण अधिकार्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत कडक सूचना दिल्या आहेत. यामध्ये घरोघरी जाऊन पाहणी करून चारचाकीबाबत नियमावली करत, तातडीने सदर महिलांचे नाव काढून टाकण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण भागामध्ये अनेकांनी व्यवसाची गरज म्हणून अथवा हौसेखातर 50 ते 90 हजारांपर्यंतच्या जुन्या चारचाकी वापरासाठी घेतल्या आहेत. या चारचाकीच आता त्यांच्यासाठी मारक ठरणार असून, यामध्ये तातडीने त्यांचे नाव योजनेतून कमी होणार आहे. याच विषयावर आता ग्रामीण भागामध्ये खमंग चर्चा सुरू असून, अनेक घरांमध्ये या जुन्या चारचाकीपेक्षाही महागड्या अशा दुचाकी आहेत, मग त्यांना योजनेचा लाभ मिळणार; पण आम्हाला वगळले जाणार, अशी चर्चा होत आहे.
जुन्या चारचाकीपेक्षा दुचाकी महाग
ग्रामीण भागामध्ये अनेक घरांमध्ये काही हजारांच्या घरातील जुन्या चारचाकी आहेत. मात्र, त्याबरोबरच बुलेटसारख्या तीन-चार लाखांच्याही दुचाकी आहेत. मात्र, राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे काही हजारांची चारचाकी असल्यास नाव बाद होणार; मात्र लाखोंची दुचाकी यातून सुटणार, अशी चर्चा वाढली आहे.