लग्न झाल्यावर पती -पत्नीमध्ये वाद होणं हे सामान्य आहे. आपल्यापैकू प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी वाद झाले असतीलच. कधी ती भांडणं पटकन मिटतात तर कधी वाद टोकाला जातो. मात्र त्या वादामुळे रागाच्या भरात एखादा माणूस अशी गोष्ट करून बसतो की त्यामुळे क्षणात होत्याचं नव्हतं होतं. असाच एक धक्कादायक प्रकार धुळ्यातूल शिरपूर तालुक्यातील थालनेर जवळ घडला. पत्नीशी झालेल्या वादानंतर एका पतीने एवंढ टोकाचं पाऊल उचललं की त्याच्यासह इतरांचंही आयुष्यही क्षणात उद्ध्वस्त झालं. पत्नीशी झालेल्या वादानंतर भडकलेल्या पतीने तो राग आपल्याच पोटच्या गोळ्यांवर, मुलांवर काढला आणि त्यांना थेत तापी नदीच्या पाण्यात फेकून दिलं. यामुळे दोघांचाही जीव गेला. या धक्कादायक घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील भुईकोट किल्ला शेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्या भावांडांचे मृतदेह तरंगत असल्याचे गावकऱ्यांना आढळलं. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. यापैकी मुलगा हा अवघ्या 5 वर्षांचा तर मुलगी 3 वर्षांची चिमुरडी होती. गावकऱ्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील भुईकोट किल्ल्याशेजारी तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगाता आढळले. गावात ही बातमी पसरताच गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि तरूणांनी त्या चिमुकल्यांना लगेच बाहेर काढून थाळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथील डॉक्टरांनी त्या मुलांना तपासून दोघांना मृत घोषित केलं.
ही दोन्ही मुलं थाळनेर येथील नायण कोळी यांची मुलं असल्याचे समोर आलं. पोलिसांनी याचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती उघड झाली. घरगुती वादातूनच मुलांच्या वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना नदीपात्रात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बायकोबरोबर झालेल्या घरातील वादामुळे पतीने आपल्या दोन्ही मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकले. तपासांती वडिलांनीच हे कृत्य केल्याची बाब उघडकीस आली असून पोलिसांनी त्या नराधम वडिलांना अटक करत त्याच्याविरोधत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मात्र पती-पत्नीच्या वादात दोन चिमुकल्यांचा जीव गेल्याने गावात खूप हळहळ व्यक्त होत आहे.