खासगी सावकारीचा अक्षरश: आगडोंब उसळल्याचे दिसत आहे. Pudhari File Photo
Published on
:
30 Nov 2024, 12:11 am
Updated on
:
30 Nov 2024, 12:11 am
कोल्हापूर : जिल्ह्यात खासगी सावकारीचा अक्षरश: आगडोंब उसळल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील हजारो कुटुंबे खासगी सावकारांच्या विळख्यात सापडून देशोधडीला लागत आहेत. मात्र सावकारांच्या दहशतीमुळे कुणी तक्रार देण्याचे धाडस करीत नाही.
जिल्ह्यात खासगी सावकारीचा इतका फैलाव झाला आहे की, सावकारी हाच अनेकांच्या पोटापाण्याचा धंदा बनला आहे. पाच-पन्नास हजार रुपये हातात आले की, कुणीही सावकारीचा धंदा मांडून बसताना दिसत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते अनेक धनदांडग्यांनी गावोगावी राजरोसपणे सावकारीची दुकाने थाटलेली दिसत आहे. कोणतीही नोकरी किंवा उद्योगधंदा न करता खासगी सावकारी करून महिन्याकाठी हजारो-लाखो रुपये विनासायास मिळत असल्याने सावकारीच्या या धंद्यात रोज नव्या सावकारांची भर पडताना दिसत आहे. कोल्हापूर शहर तर खासगी सावकारीने पुरते ग्रासून गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील गावागावात आणि गल्लीबोळात सावकारी खुलेआमपणे थैमान घालताना दिसत आहे.
वसुलीसाठी अनेक सावकारांनी आपापल्या टोळ्या तयार केल्याचे दिसत आहे. या टोळ्या एकमेकांच्या वसुलीसाठी एकमेकांना मदत करताना दिसतात. या संघटित शक्तीच्या जोरावर जिल्ह्यातील सावकार दिवसेंदिवस मुजोर बनताना दिसत आहेत. संघटित सावकारी हळूहळू संघटित गुन्हेगारीकडे वाटचाल करताना दिसत आहे. कारण जिल्ह्यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या खासगी सावकारांचा हात दिसून येतो. त्यामुळे संघटित गुन्हेगारी कायद्याचा वापर करून खासगी सावकारी मोडीत काढण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित असलेल्या लोकांचा खासगी सावकारीत मोठा वाटा आहे. सावकारांच्या ‘मॅन आणि मसल पॉवर’मुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या नादाला लागत नाही. पण गोरगरीब आणि गरजू लोक अगदी हमखासपणे सावकारांच्या पाशात अडकू लागले आहेत.
पठाणांना लाजविणारे व्याज!
उभ्या महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही आढळून येणार नाहीत इतके कोल्हापुरातील खासगी सावकारांच्या व्याजाचे दर आहेत. महिन्याला कमीत कमी 10 टक्के ते 300 टक्क्यांपर्यंत या सावकारांच्या व्याजाचे दर आहेत. म्हणजे वार्षिक 120 ते 3600 टक्के व्याजाची आकारणी सावकारांकडून केली जात आहे. जगाच्या पाठीवर कुठेही एवढ्या प्रचंड प्रमाणात व्याज आकारले जात नाही; पण कोल्हापूरचे सावकार मात्र ते आकारतात. गरजूची गरज बघून व्याजाचे दर ठरतात. गरज जेवढी तातडीची, तितके व्याजाचे दर जादा असा हा मामला आहे. घरबांधणी, लग्न समारंभ, कुटुंबातील एखाद्याचा अपघात अथवा आजारपण इत्यादी कारणांमुळे अनेकजण तातडीची गरज म्हणून खासगी सावकारांची मदत घेतात आणि नेहमीसाठी पस्तावतात.