खराब रस्त्याचा फटका; उपचार न मिळाल्याने युवकाचा मृत्यूFile Photo
Published on
:
27 Nov 2024, 5:57 am
Updated on
:
27 Nov 2024, 5:57 am
राजगड खोर्यातील सुरवड (ता. राजगड) येथील युवकाचा खराब रस्त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संदेश संभाजी इंगुळकर (वय 18) असे युवकाचे नाव आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत घडला.
संदेशचे वडील पुण्यात मार्केट यार्डात काम करतात. भात कापणीसाठी ते मुलाबाळांसह गावी सुरवडला आले होते. संदेश याला लहानपणापासून अस्थमाचा आजार होता. त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याची प्रकृती अचानक गंभीर झाली. गावात डॉक्टर अथवा दवाखाना नसल्याने वडिलांनी त्याला रिक्षातून प्रथम सोंडे माथना येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रात नेले. मात्र, केंद्र बंद असल्याने ते नसरापूरकडे जाण्यासाठी निघाले.
मात्र, अंबवणेमार्गे अत्यंत खराब रस्ता असल्याने ते कोदवडीमार्गे नसरापूर दिशेने चालले होते. याही रस्त्याची खड्डे पडून चाळण झाल्याने रिक्षा हळूहळू चालवावी लागत होती. त्यातच गुंजवणी नदीवरील कोदवडी येथील अरुंद पुलावर हार्वेस्टर मशिन अडकल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तेथे अर्धा तास गेला. तेथून पुढे ते करंजावणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. मात्र, तेथेही सुविधा नसल्याने ते संदेशला घेऊन नसरापूरकडे निघाले. तोपर्यंत संदेशची प्रकृती चिंताजनक बनली.
राजगड खोर्यातील दुर्दैवी घटना
प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या संगनमताने रस्त्याची दुरवस्था राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारतात. मात्र, राज्यातील अतिमागास राजगड तालुक्यात स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांत रस्त्यांची स्थिती बिकट आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या संगनमतामुळे रस्त्याची अवस्था दयनीय आहे.
अर्ध्या तासाच्या अंतराला लागला दीड तास
वेल्हे-नसरापूर रस्त्याचीही चाळण झाल्याने रिक्षा कशीबशी नसरापुरात आली. मात्र, तेथे बनेश्वर फाट्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नसरापुरात खासगी रुग्णालयात पोहचण्यासाठी सुरवड गावापासून दीड तासाचा वेळ लागला. मात्र, उपचारांपूर्वीच संदेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, 20 ते 30 मिनिटांच्या प्रवासासाठी खराब रस्ता, वाहतूक कोंडीमुळे दीड तास लागल्याने संदेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने इंगुळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संदेश हा अभ्यासात हुशार होता. त्याने बारावीनंतर आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या पश्चात वडील संभाजी, आई भारती व भाऊ गणेश असा परिवार आहे.
सरकारच्या गलथान कारभारामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला. राजगड तालुक्यात प्राथमिक विकासाच्या अभावी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. रस्ते नीट असते, तर माझ्या मुलावर वेळेत उपाचार झाले असते आणि त्याचा जीव वाचला असता.
- संभाजी इंगुळक, मृत संदेशचे वडील.