प्रियकर व भावाच्या मदतीने महिलेकडून पतीची हत्याPudhari File Photo
Published on
:
23 Jan 2025, 11:45 am
Updated on
:
23 Jan 2025, 11:45 am
नगर : पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ येथून ऊसतोडीसाठी पळसदेव (ता. इंदापूर, जि. पुणे) परिसरात आलेल्या महिलेने प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मिरगावजवळील रवळगाव शिवारात खाणीत आणून टाकला. पुणे व अहिल्यानगर पोलिसांनी गुन्ह्याचा शोध घेऊन प्रियकराच्या जेरबंद केला. मृताची पत्नी व भावाला यवतमाळ येथून अटक केली.
संतोष शिवाजी काळे (वय 44, रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), प्रवीण प्रल्हाद जाधव (वय 33, रा.सिंगर ता. डिग्रस, जि.यवतमाळ), ललिता दत्तात्रय राठोड (वय 25, रा.जमशदपूर, ता.पुसद, जि. यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. दत्तात्रय वामन राठोड (वय 45 रा. जमशेदपूर, ता. डिग्रस, जि. यवतमाळ) असे मयताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 10 जानेवारी 2025 रोजी रवळगाव (ता. कर्जत) शिवारात शेतात 40 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याला गळफास देऊन डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप ठार केल्याचे दिसून आले. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने शेतामधील मुरमाचे खाणीमध्ये प्रेत अर्धवट पुरून टाकले. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार बबन मखरे, विश्वास बेरड, हृदय घोडके, फुरकान शेख, रमिजराजा आत्तार, विशाल तनपुरे, रवींद्र घुंगासे, प्रमोद जाधव, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे व भाग्यश्री भिटे यांचे पथक नेमून आरोपींच्या शोधाकामी रवाना केले.
पोलिस पथकाने घटनास्थळी विचारपूस करून व परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. 21 जानेवारी रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस अंमलदार विशाल कांचन यांना माहिती मिळाली, की वरील गुन्हा संतोष शिवाजी काळे याने त्याच्या साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने संशयित आरोपीला पळसदेव येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता संतोष काळे सांगितले, की मागील दोन वर्षांपासून मयत दत्तात्रय वामन राठोड व त्याची पत्नी ललिता व तिचा भाऊ प्रवीण प्रल्हाद जाधव तिघे ऊसतोडणीसाठी पळसदेव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे येत होते. त्यातून ओळख होऊन संतोष काळे व ललिता राठोड यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ही गोष्ट ललिताचा भाऊ प्रवीण जाधव याला माहिती झाली. तिचा पती दत्तात्रय राठोड हा दारू पिऊन तिच्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता.
8 जानेवारी 2025 रोजी रात्री दहा वाजता आरोपी संतोष काळे हा ललिता राठोड हिला भेटण्यासाठी राहत असलेल्या कोपीवर गेला. तिचा पती दत्तात्रय राठोड तेथे आल्याने त्यांच्या वाद झाले. दत्तात्रय राठोड याने पत्नी ललिता हिला मारहाण केली. त्यावेळी संतोष काळे, मयताची पत्नी ललिता राठोड व प्रवीण जाधव यांनी दत्तात्रय राठोड याला मारहाण करून दोरीने गळा आवळून ठार केले. त्याचा मृतदेह तिथेच कोपीमध्ये ठेवला. दि. 9 जानेवारीला संतोष काळे याने प्रवीण जाधव याच्या मदतीने दत्तात्रय राठोड याचा मृतदेह चारचाकी वाहनाने मिरजगाव परिसरामधील शेतात खड्ड्यात टाकला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून दगड उचलून तोंडावर टाकला. त्यानंतर आरोपी ललिता राठोड व तिचा भाऊ प्रवीण जाधव दोघे यवतमाळ येथे गेल्याचे सांगितले.
पोलिस पथकाने 21 जानेवारी रोजी यवतमाळ येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन प्रवीण जाधव व ललिता राठोड यांना ताब्यात घेतले. त्यांना गुन्ह्याच्या तपासाकामी मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.