गोवा बनावटीच्या दारू मुद्देमालासह इन्सुली एक्साईजचे अधिकारी व कर्मचारी. (छाया : विराज परब)
Published on
:
17 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
17 Nov 2024, 12:30 am
बांदा : गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्या बेकायदा दारू वाहतुकीवर विरोधात इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाळेल येथे शुक्रवारी रात्री कारवाई केली. चारचाकी तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करूनही चालक वाहन सुसाट घेऊन पळाला. अबकारी अधिकार्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून वाहन अडविले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चालक जंगलातून पळून जाण्यात यशस्वी झाला. या कारवाईत 2 लाख 16 हजार 720 रुपयांची दारू व 2 लाख रुपयांची अल्टो कार असा एकूण 4 लाख 16 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गाळेल येथून गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. त्यानुसार गाळेल येथे सापळा रचण्यात आला होता. गोव्यातून येणार्या अल्टो कारला थांबवण्याचा इशारा कर्मचार्यांनी केला. मात्र, चालकाने वाहन न थांबविता सुसाट वेगाने कार पुढे नेली. एक्साईज विभागाने पाठलाग करून जिल्हा परिषद शाळेकडे कार अडवली मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चालक जंगलातून पळून गेला. एक्साईजच्या कर्मचार्यांनी कार व दारूचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, धनंजय साळुंखे, विवेक कदम यांच्या पथकाने केली.