ग्राहक : कुुटुंबच बनले ग्राहक

6 days ago 2

ग्राहक : कुुटुंबच बनले ग्राहकpudhari photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Nov 2024, 12:30 am

Updated on

17 Nov 2024, 12:30 am

योगेश मिश्र, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

भारतातील संयुक्त कुटुंबपद्धती लयास गेल्यामुळे गेल्या तीन दशकांत एकल परिवारांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकल कुटुंबात संयुक्त कुटुंबाच्या तुलनेत 20 ते 30 टक्के अधिक खर्च केला जातो. या कारणांबरोबरच इंटरनेटवरून सहज आणि गतिमान माहिती आणि ई-कॉमर्सच्या उदयाने ग्राहकांना जास्तीत जास्त खरेदी करण्यास उद्युक्त केले आहे. आता तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून घरातच नव्हे तर थेट मेंदूत बाजार घुसला आहे.

आपल्या जीवनात बाजाराने घुसखोरी केली, याचा आनंद मानावा की विशाद? बाजार विस्तारत चालला आहे आणि जीवन आक्रसत चालले आहे. बाजाराने समाजाची भूमिका गौण बनविली आहे. एक काळ असा होता, जेव्हा गावात सर्वच घरांमध्ये विस्तव पेटत नसे. आधी एका घरात विस्तव पेटत असे आणि नंतर मुली पितळेच्या किंवा लोखंडाच्या पात्रातून त्या घरातून निखारा मागून नेत असत आणि अशा रीतीने संपूर्ण गावात विस्तव पेटत असे. गावातल्या शेतात जे पिकेल, ते शेतातच बसून ज्याला जितके हवे तितके खाता येत असे. शेतात किंवा बागेत खाण्यास मनाई नव्हती. परंतु आता प्रत्येक पीक बाजारापर्यंत पोहोचवायचे आहे. त्यामुळे आता शेतात बसून खाण्यास जवळ जवळ मनाईच आहे. गावातल्या कोणत्याही जातीतल्या घरात लग्न असेल तर कोणत्याही शेतात जे पीक असेल, त्यातील काही पीक मागून नेण्यास किंवा तोडून नेण्यास मनाई नव्हती. आता गावातही बाजार पसरला आहे. तिथेही तंबूवाल्यांनी खुट्टा बळकट केला आहे. मिनरल वॉटरच्या नावाखाली बाजारू पाणी गावातही उपलब्ध आहे. विहिरी, हात पंप आणि सबमर्सिबल पंपाचे पाणी एखाद्या आयोजनासाठी अनुपयुक्त मानले जाऊ लागले आहे.

आजकाल कोणीही बाजारावरच बोलताना दिसतो. आपण कुठेही बसलो तरी ऑनलाईन मार्केटमध्ये कोणत्या वस्तूवर किती सूट आहे, याची चर्चा झाल्याशिवाय बैठक पूर्णच होत नाही. भारतात सध्या 19 हजारपेक्षा जास्त ई-कॉमर्स कंपन्या अस्तित्वात आहेत. अमेरिकेत अशा कंपन्यांची संख्या 28 हजारांच्या आसपास आहे. भारतात ई-कॉमर्स कंपन्यांची बाजारपेठ 2025 पर्यंत 111.40 अब्ज डॉलर तर 2030 पर्यंत 350 अब्ज डॉलरची होण्याची शक्यता वर्तविली जाते.

आपण शहरातल्या कोणत्याही रस्त्यावरून जाऊ लागलो तर जवळजवळ प्रत्येक घरात कोणते ना कोणते दुकान उघडलेले दिसेल. जेवढी दुकाने घराघरात उघडलेली दिसतात त्यांचे भाडे, वीज बिल, पाणी आणि कर्मचार्‍यांचे वेतन देण्याइतके तरी ग्राहक त्या दुकानाला लाभतात की नाही, याचीच शंका येते. परंतु जीवन आणि समाजावर बाजाराचे प्रभुत्व अशा प्रकारे स्थापित झाले आहे, जणू नफा कमावण्यासाठी व्यापारी काहीही करण्यास तयार आहेत. युवकांनी 2014 आणि 2015 च्या दुष्काळाचा, 2016 च्या नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या नोटाबंदीमुळे उद्भवलेल्या ग्रामीण संकटाचा आणि त्यानंतर कोरोनामुळे उद्भवलेल्या मंदीचा सामना केला. परंतु तरीही आपल्या उपभोग खर्चात वाढ करणे सुरूच ठेवले. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होण्यास मदत झाली आहे. ही प्रवृत्ती गेल्या एका दशकात सोशल मीडिया, स्मार्ट फोन आणि तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व उदयाशी मिळतीजुळती आहे. 2006-07 मध्ये दरडोई उत्पन्न 29,524 रुपये होते ते 2016-17 मध्ये 1,03,219 रुपयांवर पोहोचले. पीसीआय म्हणजेच पर कॅपिटा इन्कमने (दरडोई उत्पन्न) दहा वर्षांत 8.3 टक्क्यांची वृद्धी झाल्यामुळे गरजेच्या आणि त्याचबरोबर विनागरजेच्या वस्तूंचा उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढली. वाढत्या शहरीकरणाबरोबर उपभोग खर्च पहिल्यापासूनच प्रतिवर्ष 14 टक्क्यांनी वाढत आहे.

याबरोबरच भारतातील संयुक्त कुटुंबपद्धती लयास गेल्यामुळे गेल्या तीन दशकांत एकल परिवारांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकल कुटुंबात संयुक्त कुटुंबाच्या तुलनेत 20 ते 30 टक्के अधिक खर्च केला जातो. या कारणांबरोबरच इंटरनेटवरून सहज आणि गतिमान माहिती आणि ई-कॉमर्सच्या उदयाने ग्राहकांना जास्तीत जास्त खरेदी करण्यास उद्युक्त केले आहे. आता तर आर्टिफिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून घरातच नव्हे तर थेट मेंदूत बाजार घुसला आहे. तुमच्या डोक्यात साबणापासून मोटारपर्यंत काहीही खरेदी करण्याचा विचार आला आणि हा विचार करताना तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीच्या आसपास असाल, तर तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूच्या जाहिराती तुमच्या गॅजेटवर आपोआप येऊ लागतील. तुम्ही एखाद्या दुकानात पोहोचताक्षणी तुमच्या गरजेच्या वस्तू पॅक होऊन तुमच्या समोर येतील.

बाजारातून औषध खरेदी करता येऊ शकते; पण आरोग्य खरेदी करता येऊ शकत नाही, हे आपल्याला माहीत असताना ही तयारी चालली आहे. पैशांनी वैभवाचे आणि विलासाचे सर्व प्रकार खरेदी करता येऊ शकतात; पण वास्तव असे आहे की, कुबेराची संपत्तीसुद्धा माणसाला सुख आणि समाधानाचा अनुभव देऊ शकत नाही. ज्या विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे, माणसाचे आयुर्मान वाढविले आहे, ते विज्ञान माणसांच्या अडचणी मात्र दूर करू शकलेले नाही. भौतिक वस्तूंमध्ये खरोखर सुख आहे का? की सुखाचा शोध आपल्याच आत घ्यावा लागतो? ही बाब आता आपण विसरून गेलो आहोत. हसरा-खेळता भारत आपण पाहिला होता. सामूहिकपणे लग्न होत असे. गाणे-बजावणे होत असे. परंतु आता चार लोक मिळणेही अवघड झाले आहे.

बाजाराचा विस्तार झाल्यामुळे भुकेपासून मुक्ती मिळालेली नाही. ज्यांना समाजाचा अनुभव आहे, त्यांना पूर्वी समाजात मान असे. त्यांना गुरुस्थानी मानले जात असे. आपल्याकडे गुरू परंपरा आहे. आज मात्र अहंकाराने सर्व काही नष्ट करून टाकले आहे. 75 वर्षांमध्ये सहिष्णुता नष्ट झाली आहे. तंत्रज्ञानाचेही आवश्यक आणि अनावश्यक असे दोन हिस्से आहेत. तंत्रज्ञानाचा विकास करताना कोणती किंमत मोजावी लागत आहे, हे पाहणे गरजेचे आहे. बाजाराने मानवतेसमोर जे संकट उभे केले आहे, त्यामुळे जीवनच अज्ञात झाले आहे. मुले कुटुंबसंस्था झुगारतात. आभासी मित्रांच्या दुनियेत स्वतःला कोंडून घेतात. आजोबा-आजी आता मुलांना बोअरटाईम वाटू लागले आहेत. राईट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी गायब झाली आहे. या जगात ज्याला समस्या नाही अशी एकही व्यक्ती अस्तित्वात नाही. त्याचप्रमाणे पृथ्वीवर अशी कोणतीही समस्या नाही, ज्याचे निराकरण होऊ शकत नाही. आपला सल्लागार कोण आहे, यावर समस्येचे निराकरण अवलंबून आहे.

दुर्योधन शकुनीकडून सल्ला घेत होता व अर्जुन श्रीकृष्णाकडून! बाजारपेठेने शकुनीकडून सल्ला घेण्याची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. तुम्ही अपयशी झाल्यानंतर तुमच्यावर सार्वजनिकरीत्या टीका करणारे लोक निश्चितच तुमचे शुभचिंतक नाहीत. शुभचिंतक तुम्हाला एकांतात तुमचे दोष सांगतात. सार्वजनिकरीत्या टीका करणारे लोक केवळ आपल्या मनातील खदखद बाहेर काढत असतात. सार्वजनिकरीत्या टीका करणार्‍यांचे शब्द ऐकले जरूर पाहिजेत; पण ते मनावर घेता कामा नये. संस्कृतींच्या अभिसरणानंतर जे बदल आले, त्यात आर्थिक तत्त्व प्रमुख बनले आहे. भरलेले पोटच पुन्हा भरण्याच्या वृत्तीनेच एकमेकांबद्दल अपरिचयाला जन्म दिला आहे. नैराश्यासारखे अनेक मनोशारीरिक आजार मनातील उलथापालथींमधूनच जन्म घेतात. नैतिक मूल्यांचे आचरण आणि चेतनेचे शुद्धीकरण हाच धर्म आहे. धर्म आणि धार्मिक संस्कार आपल्याला कधीही स्वार्थी आणि आत्मकेंद्री बनवत नाहीत. धर्माचा उद्देश एक संतुलित, समानतामूलक आणि उन्नत समाज निर्माण करणे हा असतो.

आपले मन हेच आपल्या स्वातंत्र्याचे आणि पारतंत्र्याचे कारण बनले आहे. सुख आणि दुःख, शक्ती आणि दुर्बलता हे सर्व काही मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असते. वेदांनुसार, मन हे भौतिक शरीर आणि आध्यात्मिक स्व या दोहोंपासून भिन्न आहे. आध्यात्मिक स्व हा जाणकार आहे आणि मन हे जाणकार होऊन ज्ञान ग्रहण करण्याचा विषय आहे. मन हा अतिसूक्ष्म पदार्थ आहे. माईंड आणि मॅटर यामध्ये फरक करणार्‍या पाश्चात्य दृष्टिकोनापेक्षा हा वेगळा दृष्टिकोन आहे. वेदांतानुसार, मन हे आंतरिक उपकरण आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे हीच मनुष्याच्या विकासाची खरी कसोटी आहे. परंतु आनंदाच्या वेळी आनंद साजरा करू न देणारेही मनच असते. पावसाळ्याची चाहूल लागताच मोर मग्न होतात. परंतु मनुष्याला पावसाळा सुरू होताच हिवाळा आठवतो. हिवाळा येताच उन्हाळ्यातील घाम आठवतो. आपण सोडून संपूर्ण जग आनंदी आहे, असे वाटणे हेमनुष्याच्या मनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

मन आधी भौतिकतेच्या पूर्ततेचा प्रयत्न करते; परंतु जेव्हा त्या सुविधा मिळत नाहीत तेव्हा ते विरागी होते. मनाच्या सर्व प्रक्रिया सामूहिकतेमध्येच सकारात्मक असतात. एकटेपण मनाला टोचत राहते. घाबरवून सोडते. चांगले कपडे घालणे, चांगले राहणीमान या सर्व गोष्टी ज्या आपण स्वतःसाठी करतो, त्या वस्तुतः आपण दुसर्‍यांसाठी करत असतो. आज आपण आपला मेंदू आणि जीवन बाजाराच्या स्वाधीन केले आहे. कायद्याने सरकार चालते; समाज नाही. बाजाराचीही भूमिका अशीच असते. पृथ्वीवर कसे राहायचे हे मनुष्य अद्याप शिकू शकलेला नाही. शिक्षण आणि संस्कारांनीच हे होईल. परंतु बाजारपेठ हे होऊ देणार नाही. जग बाजारू अस्त्रांवर विराजमान आहे. बाजारातील लढाईत हरणारा हरेलच; परंतु जिंकणाराही हरेल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article