बॉलिवूड मधील अत्यंत देखणा आणि उत्तम अभिनेता म्हणून जॅकी श्रॉफ यांना ओळखलं जातं. तसेच अनेकांना माहितही नसेल की जॅकी श्रॉफ यांचं खरं नाव जयकिशन आहे. मात्र सिनेसृष्टीत त्यांना जॅकी अशी ओळख मिळाली. हिंदी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणारे जॅकी श्रॉफ 67 वर्षांचे आहेत. या वयातही त्यांनी स्वत:ला एकदम फिट ठेवलं आहे. जॅकी श्रॉफ यांना आरोग्याची कोणतीही मोठी समस्या नसली तरी ते थॅलेसेमियाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत आणि या आजाराबद्दल जनजागृती करतात. तर वयाच्या 67 व्या वर्षीही जॅकी श्रॉफ स्वत:ला पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त कसे ठेवतात. चला जाणून घेऊयात त्यांच्या फिटनेसचं सिक्रेट…
जॅकी श्रॉफ हे गुजराती कुटुंबातील असल्याने नेहमी शाकाहारी आहार घेत असतात. मात्र कधी कधी शरीरात प्रथिनांची कमतरता भासू नये यासाठी अंडी खातात. मध्यंतरी त्यांची कढीपत्ता ऑमलेट रेसिपीही खूप व्हायरल झाली होती. जॅकी श्रॉफ हे त्यांच्या वयाच्या इतर कलाकारांच्या तुलनेत एकदम फिट आहे, कारण मुंबईसारख्या शहरात राहूनही साधी जीवनशैली ते जगत आहे.
जॅकी श्रॉफ यांना साध्या घरगुती जेवणाची आवड
जॅकी श्रॉफ यांचं मुंबईपासून दोन तासांच्या अंतरावर खंडाळा येथे घर आहे. जॅकी श्रॉफ त्यांचा बहुतांश वेळ फार्महाऊसवर एकटेच घालवतात. त्यांच्या खंडाळाच्या घरी ते सेंद्रिय शेतीही करतात. जेव्हा शक्य असेल तेव्हा या शेतीमध्ये असलेल्या पालेभाज्या आणि भाज्यांपासून बनवलेले अन्न खायला ते पहिले प्राधान्य देतात. एवढंच नाहीतर चुलीवरच जेवण आणि बऱ्याचदा जेवणात कमी तेल आणि मसाले वापरू साधे अन्न खाणे पसंत करतात.
जॅकी श्रॉफ नेहमी या शारीरिक हालचालींमुळे तंदुरुस्त राहतात
बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ हे स्वतः साधे आणि संतुलित अन्न खाऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करतात, तसेच फिट राहण्यासाठी शारीरिक हालचालींवरही भर देतात. जॅकी श्रॉफ दररोज योगाभ्यास करतात. ज्या दिवशी ते योगा करत नाही, त्या दिवशी ते व्यायाम आणि स्विमिंग करत असतात. दरम्यान अभिनेत्याच्या फार्महाऊसमध्ये स्विमिंग पूल आणि जिम दोन्ही असल्याने ते नियमित व्यायाम करत असतात. अशा तऱ्हेने जॅकी श्रॉफ साध्या जीवनशैलीतून आपलं निरोगी आरोग्य तंदुरुस्त ठेवतात.