अभिनेत्री झीनम अमान यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आता वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. इन्स्टाग्राम विविध पोस्ट लिहित त्या सतत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. या पोस्टद्वारे ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अनुभव सांगत असतात. नुकत्याच लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी एक धक्कादायक अनुभव सांगितला. उच्च रक्तदाबाची गोळी कशा पद्धतीने त्यांच्या घशात अडकली आणि त्यानंतर कसा त्यांचा जीव धोक्यात आला, याविषयी त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.
झीनत अमान यांची पोस्ट-
‘अंधेरी पूर्व इथल्या स्टुडिओमध्ये दिवसभर शूटिंग केल्यानंतर मी घरी परतले. रात्री झोपण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणे बीपीची गोळी घ्यायला गेले. मी तोंडात गोळी टाकली आणि त्यानंतर पाणी प्यायले. पण ती गोळी माझ्या घशात अडकून राहिली. ती गोळी मला बाहेरही काढता येत नव्हती आणि पूर्णपणे गिळताही येत नव्हती. मी श्वास घेऊ शकत होते, पण त्यातही अडचण जाणवत होती. मी ग्लासभर पाणी पिऊन गोळी पूर्णपणे गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही ती घशातच अडकून राहिली. घरात एक पाळीव श्वान आणि पाच मांजरींशिवाय कोणीच नव्हतं. गोळी घशाखाली जात नसल्याने हळूहळू मी पॅनिक होऊ लागले,’ असं झीनत अमान यांनी लिहिलं.
हे सुद्धा वाचा
याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, ‘त्यातच डॉक्टरांचा नंबर बिझी लागत होता. अखेर मी घाबरून झहान खानला (मुलगा) कॉल केला आणि तो धावतपळत माझ्या घरी आला. तो घरी येईपर्यंत मी अस्वस्थच होते, श्वास घेण्यात मला अडचण जाणवत होती. अखेर झहान आल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो, तर ते म्हणाले की थोड्या वेळाने ती गोळी आपोआप विरघळून जाईल. मग पुढील काही तास मी कोमट पाणी पित गोळीच्या विरघळण्याची प्रतीक्षा करत होते.’
‘आज सकाळी उठल्यानंतर मला त्या घटनेविषयी थोडीफार लाज वाटू लागली होती. पण हा अनुभव इथे सांगावा असं मला वाटलं. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी कठीण वेळ येतेच, जेव्हा तुम्हाला संयमाने वागावं लागतं. बीपीची गोळी याचंच उत्तम उदाहरण होती. त्या गोळीमुळे मला प्रचंड त्रास झाला, मी दुसऱ्यांकडून तातडीने मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण अखेर मला संयमानेच परिस्थिती हाताळावी लागली. माझ्यातील भीतीवर नियंत्रण मिळवून, संयम राखून मी जेव्हा गोळीच्या विरघण्याची प्रतीक्षा केली, तेव्हा सर्वकाही ठीक झालं. अशाच पद्धतीने आयुष्यातही कधीकधी एखाद्या समस्येला प्रत्यक्ष सामोरं जाणं महत्त्वाचं असतं. त्याला तोंड देणं, आव्हान देणं आणि बदलणं गरजेचं असंत. पण कधीकधी परिस्थितीसाठी संयम, प्रतीक्षा आणि समता यांसारख्या सौम्य कृतींची आवश्यकता असते’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.