Published on
:
05 Feb 2025, 12:42 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:42 am
बेळगाव : गेल्या आठ दिवसापासून चांदी दरात गतीने वाढ होत आहे. आठवडाभरापूर्वी चांदीचा प्रति किलो दर 94 हजार रुपये होता. सध्या तो 97 हजार रुपयांवर पोचला आहे. सध्या लग्नसराईची धूम असून सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ होत आहे. चार महिन्यांपूर्वी चांदीचा दर 1 लाख 3 हजारापर्यंत गेला होता. केंद्र सरकारनेही आयात शुल्क कमी केल्याने दरात घट झाली होती. पण, आता पुन्हा एकदा चांदीचा दर लाखाचा टप्पा गाठण्याची चिन्हे दिसत आहेत.
मंगळवारी (दि. 4) 24 कॅरेट सोन्याचा दर 86,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. सोने दरातही आठ दिवसांत चार हजारांची वाढ होत आहे. आगामी दोन महिन्यात लग्न सराईचा जोर वाढणार आहे. यादरम्यान सोन्या चांदीच्या दागिन्यांचे दरही वाढत असून सामान्य ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या दरात 15 ते 20 हजार रुपयांचा फरक आहे. जागतिक घडामोडीचा सोने व चांदी दरावर नेहमी परिणाम होतो. यामुळे आगामी काळात आणखी दर वाढतील, असा अंदाज येथील सराफी व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. गत वर्षी मार्चनंतर सोन्यासह चांदी दरातही झपाट्याने वाढ झाली होती. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. दर आणखी वाढेल म्हणून काही ग्राहकांकडून आताच आपल्या दागिन्यांच्या कामाची ऑर्डर दिली जात आहे. यंदा विवाह मुहूर्तही बक्कळ आहेत. त्यामुळे, सराफी बाजारात दागिने न्याहळण्यासाठी गर्दी दिसत आहे.