काल दिवसभरात अंजली दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर धुवाधार असे आरोप केले. कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी 275 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप दमानिया यांनी केला. आणि त्यानंतर मुंडे यांनी बदनामिया म्हणत दमानिया यांचे आरोप फेटाळले. मात्र पुन्हा पत्रकार परिषद घेत टीका केल्यानंतर आता मुंडे यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचा निर्णय घेतला आहे.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंवर आरोपांचा बॉम्ब टाकला आहे. जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत कृषी मंत्री असताना पाच वस्तूंच्या खरेदीमध्ये तब्बल पावणे तीनशे कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. यामध्ये पहिला आरोप नॅनो युरियाची 92 रुपयांची बाटली 220 रुपयांना विकत घेतली. दुसरा आरोप नॅनो डीएपीची 269 रुपयांची बाटली 590 रुपयांना विकत घेतली. तिसरा आरोप बॅटरी स्प्रेअर 2946 रुपयांना उपलब्ध असताना 3626 रुपयांना खरेदी केले. चौथा आरोप गोगलगाय निर्मूलनासाठी वापरलेले स्नेलकिल औषध 817 रुपयांना मिळत असताना 1275 रुपये प्रति किलो विकत घेतले. विशेष म्हणजे डीबीटी अर्थात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची प्रक्रिया बाजूला केली. आधी निविदा प्रक्रिया पूर्ण न करता कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोपही दमानिया यांनी केला. दरम्यान दमानिया यांचे आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले. तब्बल 59 दिवसांपासून आपल्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे. असं धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान अंजली दमानिया यांचा उल्लेख त्यांनी अंजलीताई बदनामिया असा देखील केला आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांनी आता दमानिया यांच्यावर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अंजली दमानिया यांनी पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे आणि बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की कृषी विभागातील तात्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदींनुसार आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतर झाली आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू झाली. यासह इतर अनेक मोठमोठे आरोप करणाऱ्या दमानी ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार आहे’, असं मुंडेंनी म्हटलंय.
Published on: Feb 05, 2025 09:02 AM