मराठी भाषेवरून सध्या राज्यात वाद पेटलेला आहे. महाराष्ट्रात, मुंबईत राहूनही काही ठिकाणी लोकं मराठी बोलण्यास थेट नकार देतात, पण नुकतंच महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा संवर्धनासाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांमध्येही सगळीकडे मराठीत फलक असतील, तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान रोजच्या जीवनात आपण बहुसंख्य जण मराठी बोलतो, ऐकतो, वाचतो, काही जण मराठीतच लिहीतात. पण तरीही मराठीतील काही शब्दांबाबत लोकांच्या मनात प्रश्न उद्भवतात, कोणता शब्द योग्य याचा संभ्रम अनेक लोकांच्या मनात असतो. त्यापैकीच एक प्रश्न अनेक लोकांच्या नात आहे तो म्हणजे, बालदी की बादली, यापैकी योग्य शब्द कोणता ?
तर, बालदी हाच शब्द योग्य आहे.. आता तोच कसा, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना, चला तर मग जाणून घेऊया, त्यामागचं कारण. हा शब्द कसा आला, तेही समजून घेऊया.
मुळात एक पोर्तुगीज शब्द आहे ‘बाल्डे’ त्याचा अर्थ पोहरा किंवा चामड्याची पिशवी. मिळालेल्या माहितीनुसार, 16 व्या शतकात पोर्तुगीज वसाहती बंगालमध्ये वसल्यानंतर ते पाणी भरण्याच्या भांड्याला ‘बाल्डे’ असे म्हणत. त्या काळात बंगाली भाषेने ‘बाल्डे’ला ‘बालटी’ म्हणून आपल्यात सामावून घेतले आणि नंतर हिंदीने ‘बालटी’ शब्द आहे तसा उचलला. त्याच हिंदीवरून मराठीत आला “बालदी”
हे सुद्धा वाचा
बालदीचं बादली कसं झालं ?
मग मूळ शब्द बालदी असा असताना त्याचं बादली कसं झालं, असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. इतके लोकं बादली म्हणतात, मग ते कसं शक्य आहे ? असंही काहींना वाटलं असेल. पण त्याचं कारण म्हणजे, तो ( बादली हा शब्द) रूढ झाला. म्हणजेच काय झालं असावं, तर जाऊ दे ना, काय फरक पडतो, भावना तर पोहोचतात ना, असं म्हणून एकाने बादली म्हणायला सुरूवात केली, ते ऐकून दुसऱ्याने, मग तिसऱ्या व्यक्तीनेही बादली असं म्हणायला सुरूवात केली. असं करतात करता आता बहुसंख्य जनता बादली म्हणते. पण मूळ शब्द हा बालदी असाच आहे. शब्दकोशातही बालदीच शब्द लिहीला आहे,कुठेही तुम्हाला बादली असा शब्द सापडणार नाही.
आपण थोडीशीच मेहनत घेतली , तर योग्य शब्दाचं अस्तित्व टिकून राहील, आपलं म्हणणंही पोहोचवेल आणि चुकीचा शब्द हळूहळू का होईना मागे पडेल. त्यामुळे शब्दांचा वापर करताना जपून आणि समजून-उमजून करा. त्यामुळे तुमच्यापैकी जे लोक बालदी असं म्हणत असतील,त्यांनी आपल्याच पाठीवर एक शाबासकी द्या, आणि जे अजूनही बादली असा उच्चार करत असतील, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवा आणि योग्य शब्द त्यांनाही सांगा ! काय , करणार ना योग्य उच्चार !