चिकलठाणा एमआयडीसीला मिळाली नवसंजीवनी

1 hour ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

02 Oct 2024, 6:24 am

Updated on

02 Oct 2024, 6:24 am

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेल्वेस्टेशन एमआयडीसीनंतर शासनाने एका वर्षभरातच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीची घोषणा केली. १९६५ साली स्थापना आणि १९७७ सालापर्यंत ६३३.१८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करून प्लॉट वितरित केले. दोन वर्षांत एमआयडीसी नवउद्योगांनी गजबजली. परंतु महापालिकेच्या जकात वसुलीमुळे अवघ्या दोन दशकांत या वसाहतीतील ९० टक्के कंपन्या वाळूज एमआयडीसीत स्थलांतरित झाल्या. त्यामुळे ही एमआयडीसीही रेल्वेस्टेशनप्रमाणे ओस पडली. परंतु मागील दीड वर्षात येथील बंद उद्योगांच्या जागेत लघु व सूक्ष्म उद्योग सुरू झाल्याने चिकलठाण्याला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे.

मराठवाड्यातील दुसरी एमआयडीसी असलेल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्याप्रमाणात विभागातीलच नव्हे तर जळगाव, विदर्भातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. त्यानंतर १९८२ साली केंद्र व राज्य शासनाने वाळूज एमआयडीसीची स्थापना केली. या एमआयडीसीमध्ये बजाज कंपनीने गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्यामुळे चिकलठाणा एमआयडीसीतील ऑटोमोबाईल क्षेत्रातील लघु उद्योगांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

बजाजमुळे शहराचा औद्योगिक विकास चिकलठाणा, झाला. त्यासोबतच रेल्वेस्टेशन एमआयडीसीवर त्याचा दुष्परिणामही झाला. या परिसरातील अनेक कंपन्या बंद पडल्या. येथील उद्योजकांनी मनपाच्या जकात कराला कंटाळून वाळूजमध्ये स्थलांतर केले. मात्र आज जकात व एलबीटी वसुली बंद झाली आहे. त्यात चिकलठाण्यातील अनेक मोठ्या बंद उद्योगांच्या जागेची विक्री करून त्यांचे सबडिव्हिजन केले आहे.

त्यात मागील दीड वर्षात सूक्ष्म व लघु अशी ७०० उद्योग नव्याने सुरू झाली आहेत. या उद्योगांमुळे चिकलठाणा एमआयडीसीला पुन्हा नवसंजीवनी लाभली आहे.

६३३ हेक्टरमध्ये १,५२० प्लॉट

चिकलठाणा एमआयडीसीसाठी ६३३.१८ हेक्टर जमीन संपादित केली. त्यात पायाभूत सुविधांसह १,५२० प्लॉट तयार करण्यात आले. यातील १,५१२ प्लॉटचे वितरण झाले. त्यावेळी अगदी नाममात्र म्हणजे १६ रुपये चौरस मीटर दराने प्लॉट उद्योजकांना देण्यात आले. चिकलठाण्यातील सुमारे ९२ टक्के प्लॉटवर उद्योग उभारले गेले. मात्र दोन दशकांत ही एमआयडीसी ओस पडली. येथील बहुतांश उद्योजकांनी वाळूजमध्ये एक्स्पांन्शन करून येथील उद्योग नाममात्र ठेवला, तर काहींनी उद्योग बंद केले.

चिकलठाणा एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर १९९६ सालापर्यंत येथे अनेक मध्यम व लघु उद्योग सुरू झाले. त्यात पुनम बिस्कीटची कंपनी यासह मिसुकी नावाची दुचाकी तयार करणारी कंपनी बंद पडली. त्यासोबतच दुचाकी, चारचाकी वहनांना सूट भाग पुरवणारे अनेक उद्योग बंद पडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article