चिपळूण : शहरातील मतदान केंद्रांवर नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर उत्स्फूर्तपणे अशा रांगा लावलेल्या पहायला मिळाल्या.pudhari photo
Published on
:
21 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
21 Nov 2024, 12:30 am
चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी आज सकाळच्या टप्प्यात उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. मतदारसंघातील 336 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वा. मतदान सुरू झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 69 टक्के मतदान होईल अंदाज आहे. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाचीसारखे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. दरम्यान, परस्पर दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला असून आता मिरवणुकीची तयारी सुरू झाल्याचे सांगितले.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीतून आ. शेखर निकम तर महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव यांच्यासह अन्य चारजण रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत यादव विरुद्ध निकम अशी रंगणार आहे. या ठिकाणी दोन एकाच नावाचे उमेदवार देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे या लढाईत ते किती मते घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज (दि. 20) सकाळी 7 वा. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाला प्रारंभ झाला. वृद्ध नागरिक, महिला आणि नवमतदारांनी उत्साहात मतदान केले. ज्या ज्येष्ठ नागरिकांना गृह मतदानाचा लाभ घेता आला नाही, अशा वृद्धांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. उमेदवार शेखर निकम व प्रशांत यादव यांनी सकाळपासूनच चिपळूणपासून संगमेश्वरपर्यंत आपल्या बूथना भेटी दिल्या आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.(Maharashtra assembly poll)
पक्षाच्या बूथवर योग्यप्रकारे मतदान प्रक्रिया सुरू आहे ना याची खात्री केली. यामध्ये आ. शेखर निकम, माजी सभापती पूजा निकम व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. विरोधी उमेदवार प्रशांत यादव यांच्यासह चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव,कन्या स्वामिनी यांनीदेखील मतदारसंघातील बहुतांश बूथना स्वत: भेटी दिल्या आणि पाहणी केली.
सकाळी 7 वा. मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी 7 ते 9 या पहिल्या टप्प्यात मतदारसंघात 10.14 टक्के, 7 ते 11 या वेळेत 24.57 टक्के, 11 ते 1 या वेळेत 40.77 टक्के, दुपारी 1 ते 3 पर्यंत 52.33 टक्के, 3 ते 5 वाजेपर्यंत 63.51 टक्के मतदान झाले आहे. पुढील तासाभरात सुमारे 5 ते 7 टक्के मतदान वाढण्याची शक्यता असून चिपळूण-संगमेश्वर विधानसभेसाठी 68 ते 70 टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या बाहेर महाविकास आघाडी व महायुतीचे बूथ लागले होते. या ठिकाणी दोघांचेही कार्यकर्ते हजर होते. मतदार या बूथवर गर्दी करताना पाहायला मिळाले.(Maharashtra assembly poll)
निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे हे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. 149 केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला होता. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
मतदानासाठी चाकरमानी आले धावून...
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चाकरमानी आल्याचे दिसून आले. मुंबई आणि पुण्यामधून लक्झरी बस आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदार आपापल्या गावी दाखल झाले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे या भागातून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी मतदानासाठी दाखल झाले होते. यामुळे महामार्गावर सकाळी उशिरापर्यंत वाहनांची मोठी वर्दळ होती. सायंकाळी हे चाकरमानी मतदान करून परतीच्या प्रवासाला लागल्याने महामार्ग वाहनांनी फुलला होता.