चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर पाकिस्तान आणि दुबईत होत आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. जर भारताने उपांत्य आणि अंतिम फेरी गाठली तर तेही सामने दुबईतच होतील. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून साखळी फेरीत हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. मागच्या पर्वात पाकिस्तानने भारताचा अंतिम फेरीत धुव्वा उडवला होता. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने जेतेपदासाठी कंबर कसली आहे. असं असताना पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तरने एक भाकीत वर्तवलं आहे. अख्तरने एका मुलाखतीत दावा केला की, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानचा संघ टीम इंडियाला पराभूत करेल.’ शोएब अख्तरच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला हायव्होल्टेज सामना होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. दुसरीकडे, टीम इंडिया अंतिम फेरी गाठेल असंही शोएब अख्तर म्हणाला आहे. इतकंच काय तर अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो असंही त्याने सांगितलं.
शोएब अख्तरने दावा करत सांगितलं की, भारत आणि पाकिस्तान हे संघ उपांत्य फेरी गाठतील. पण अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठेल. अख्तरच्या मते, अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारू शकतो. मागच्या काही वर्षात अफगाणिस्तानने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे कमकुवत संघ समजण्याची चूक महागात पडू शकते. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या दिग्गज संघांना पराभूत करत उलटफेर केला होता. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या जवळ पोहोचली होती. पण ग्लेन मॅक्सवेलने त्यावर पाणी टाकलं होतं.
साखळी भारताचा पहिला सामना दुबईत बांगलादेशशी होणार आहे. हा सामा 20 फेब्रुवारीला होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. 2 मार्चला साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर साखळी फेरीतील दोन सामने जिंकणं आवश्यक आहे. इतकंच काय तर नेट रनरेटही चांगली ठेवावा लागणार आहे.