आचरा: गाड यांच्या घरात चोरट्यांनी फोडलेली कपाटे. (छाया ः उदय बापर्डेकर)
Published on
:
24 Jan 2025, 1:10 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:10 am
आचरा : आचरा-कणकवली रस्त्यावरील त्रिंबक-बगाडवाडी येथे राहणारे केंद्रप्रमुख शिक्षक राजेंद्र प्रसाद गाड यांच्या घरात भरदिवसा गुरुवारी सकाळी घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली. घरातील कपाटे फोडून कपाटातील वेगवेगळ्या भागात ठेवलेली अंदाजे 25 हजार रुपये रक्कम आणि कपाटातील बनावट दागिने चोरट्यांनी लंपास केले.
गुरुवारी सकाळी 8.30 वा. दरम्यान गाड दाम्पत्यापैकी रुचिरा गाड या बैठकीच्या कार्यक्रमासाठी तर राजेंद्र गाड हे घराला कुलूप लावून शाळेत जाण्यासाठी निघून गेले होते. या दरम्यान, चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा फोडून घरातील ऐवजावर डल्ला मारला.
बैठकीवरून सकाळी 11 वा.च्या सुमारास रुचिरा गाड घरी परतल्या असता दर्शनी भागाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला असता घरातील कपाटे उघडी टाकलेल्याअवस्थेत, वस्तू विखुरलेल्या अवस्थेत दिसल्या. घराच्या मागील बाजूचा मागचा दरवाजा फोडलेल्या अवस्थेत उघडा दिसला. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पती राजेेंद्र यांना घटनेची माहिती दिली. पोलिसपाटील सिताराम सकपाळ यांनी आचरा पोलिस स्टेशनला खबर देताच पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, उपनिरीक्षक चोरगे, पोलिस कर्मचारी मनोज पुजारे, महिला पोलिस कर्मचारी तांबे घटनास्थळी दाखल झाले.
त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, ग्रामसेविका माधुरी कामतेकर, तलाठी शेजवळ, पोलिस पाटील सिताराम सकपाळ, सारंगी चव्हाण, गणेश गोसावी, सिमा घाडीगांवकर, आचरा पोलिसपाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी यांसह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. आचरा पंचक्रोशीत भर दिवसा वारंवार चोरीच्या घडणार्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
घटनास्थळी महिला व पुरुष यांचा चप्पलांचे ठसे
गाड यांच्या घराभोवती उंच दगडी कुंपण आहे. या कुंपणालगत माड व इतर झाडे आहेत. चोरट्यांनी मागील बाजूने दगडी कुंपणावर चढून आतमध्ये उडी मारून आत प्रवेश केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या भागात महिला आणि पुरुष यांच्या चप्पलांचे ठसे ओल्या मातीत स्पष्ट दिसत होते. या भागात गेल्या आठ दिवसापूर्वी दोन महिला फुले शोधत असल्याचा बहाणा करत फिरत होत्या. काही ग्रामस्थांनी त्या महिलांना उलट सुलट प्रश्न विचारल्यावर त्यांनी पळ काढला होता अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
खोटे दागिने लंपास खरे दागिने सुरक्षित!
गाड यांनी रोजच्या वापरासाठी एक ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेले बनावट दागिने बनवून घेतले होते. ते आपल्या कपाटातील लॉकरच्या कप्प्यात ठेवले होते, तसेच लाखो रुपयाच्या किंमतीचे सोन्याचे दागिने मात्र दुसरीकडे ठेवले होते. चोरट्यांनी लॉकरच्या कप्प्यातील दागिने सोन्याचे म्हणून लंपास केले. मात्र खर्या दागिन्यांची पिशवी तिथेच टाकली होती. खरे दागिने सुरक्षित राहिले. एका खोलीत असलेला किमती लॅपटॉप जागेवरून उचलून मागील दराकडे टाकलेला होता. कोणीतरी येत असल्याचा सुगावा चोरट्यांना लागल्याने तो लॅपटॉप तिथेच टाकून पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.