एकनाथ शिंदे हे काही शिवसेनाप्रमुख नाही की शिवसेनाप्रमुखांचे वारसदारही नाहीत. शिंदे आणि त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भीताने पळून गेले आहेत. शिंदेंच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. कधी एक पुस्तक तरी वाचलंय का? पेपर तरी वाचतो का हा माणूस. काय म्हणतो. आमचं बघू ना आमची मनगटं, तुमच्यावर मनगटं चावण्याची वेळ येणार आहे. तुमच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती हल्ला चढवला. काल मुंबईत झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुका एकट्यान लढवण्याचे संकेत दिल्यावर एनकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.
स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते, घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. शिंदेंच्या याच विधानाला प्रत्युत्तर देताना आज संजय राऊतांनी त्यांच्यावरच हल्लाबोल केला. तुमच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही. मोदी आणि अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात मुजरे घालण्यासारखं आहेत. तुमची सत्ता आणि प्रतिष्ठा कायम राहणार नाही. तुम्ही तात्पुरते आहात. ज्यांनी ही पदे तुम्हाला दिली तेच तुमची पदे काढून घेतील आणि तुमच्यातीलच लोक तुमच्या उरावर बसवतील असा इशारा राऊत यांनी दिला.
काय म्हणाले संजय राऊत ?
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची काल जयंती होती, त्यानिमित्ताने मुंबईत काल दोन मेळावे झाले. वांद्रे कुर्ला संकुलात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा झाला, त्यामध्ये शिंदेनी ठाकरेंवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या या विधानांचा आज संजय राऊत यांनी समाचार घेतला. ” काल बीकेसीत सोनू निगमचा ऑर्केस्ट्रा होता, त्यासाठी लोक आले होते. ऑर्केस्ट्रा पाहायला लोक येतात. त्यावेळी काही लोकांची भाषणं झाली. आमच्या दंडात दम नाही म्हणता तुमची चड्डी सांभाळा. तुमच्या चड्डीचा नाडा दिल्लीवाल्यांच्या हाती आहे. ते कधीही खेचतील आणि नागडे व्हाल. आम्ही लाचार नाही. आम्ही सत्तेसाठी आलेलो नाही. आमचा पक्ष आहे. तुमच्यासारखे लाचार येतात आणि निघून जातात” असे म्हणत राऊत यांनी शिदेंवर घणाघाती हल्ला चढवला.
बावनकुळेंना ताबडतोब अटक करा
दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच शिवसेना नेत, आमदार आदित्य ठाकरेंवरही टीका केली होती. आदित्य ठाकरे हे बालिश आहेत, राजकारणाचा मूळ गाभा त्यांना समजलेला नाही, असे बावनकळे म्हणाले होते. त्यांच्या या विधानासंबंधी बोलताना राऊत यांनी चोख शब्दांत प्रत्युत्तर दिलं. ” हे बावनकुळे तेच गृहस्थ आहेत ना ज्यांनी 600 कोटींचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लूटला तेच ना हे . असा बालिशपणा आम्ही करणार नाही,असे म्हणत राऊतांनी त्यांना टोला लगावला”. ” ईडी आणि सीबीआय कुठे आहे. या माणसाला अटक केली पाहिजे. फडणवीस यांनी त्यांना महसूलमंत्री करून गुन्हा केला. बावनकुळे तुम्ही 600 कोटींचा भूखंड एक रुपयाला घेतला. आम्हाला द्याल का. कोण बावनकुळे, ते तर रावणकुळे आहेत.” त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे अशी मागणीच राऊतांनी केली.