सांगली ः सांगली ग्रामीण पोलिसांनी पत्रा चोरीतील संशयितांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला.pudhari photo
Published on
:
26 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
26 Nov 2024, 12:45 am
सांगली ः माधवनगर रस्त्यावरील पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपोमधून कंपनीत काम करणार्या आजी-माजी कर्मचार्यांनी 33 लाख रुपयांचे पत्रे चोरून नेले होते. या चोरीचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले. याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली असून चोरीचे पत्रे विकून संशयितांनी डीजे, चारचाकी वाहन खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी पत्रे, डीजे आणि चारचाकी वाहनही जप्त केले.
अनिरूद्ध सुरेश पाटील (वय 24), प्रशांत नामदेव साळुंखे (वय 32), रोहित गौतम रोकडे (वय 30), सचिन तानाजी जाधव (वय 45) आणि नीलेश म्हाळप्पा ढगे (वय 32) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी योगेश मेघराज बेदमुथा यांच्या मालकीचा माधवनगर रस्त्यावर पत्रा डेपो आहे. या कंपनीत काम करणारे जुने कामगार अनिरुद्ध पाटील व प्रशांत साळुंखे यांनी संगनमत करून 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे 130 नग कलर कोटेड पत्रे चोरून ते विक्रीसाठी नेत असताना मिळून आले.
यापूर्वीही संशयित रोहित रोकडे व नीलेश ढगे यांनी माल चोरून नेल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे, हेड कॉन्स्टेबल मेघराज रुपनर, महेश जाधव, बंडू पवार यांनी संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. यातील अनिरुद्ध पाटील याने चोरीच्या पत्र्यांची विक्री करून त्यातील पैशातून डीजे खरेदी केला होता, तर नीलेश ढगे याने चारचाकी खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी डीजे व वाहन जप्त केले.
चोरीचा माल खरेदी करणारा संशयित सचिन जाधव याच्याकडून पत्र्याचे रोल हस्तगत करण्यात आले. संशयितांकडून 33 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे करीत आहेत.