नवरदेव इतका नाचला की लग्नच मोडलं.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. या निमित्ताने नात्यागोत्यातील सर्व पाहुण्यांना भेटता येतं. त्यांच्याशी बोलता येतं. शिवाय लग्नानंतर प्रत्येकाचं दुसरं आयुष्य सुरू होत असतं. त्यामुळेच आपला विवाह सोहळा अविस्मरणयी करण्यासाठी प्रत्येकाचे फंडे सुरू असतात. कोणी लग्नाची विशेष थीम ठेवतं, तर कोणी डेस्टिनेशन वेडिंगवर भर देतं. तर कुणी साधच लग्न करतात, पण त्यातही वेगळेपण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. दिल्लीतील एका अति उत्साही तरुणाला मात्र लग्नातील उतावीळपणा चांगलाच नडला आहे. एका गाण्यामुळे या नवरोबाचं लग्नच मोडलं आहे.
हा नवरदेव वरात घेऊन नवरीच्या मंडपात आला होता. त्याचे मित्र मंडळीही सोबत होते. त्यावेळी या मित्राने नवरदेवाला चोली के पीछे क्या है या गाण्यावर डान्स करण्याचा हट्ट धरला. मित्रांचा हट्ट त्याला मोडता आला नाही. यावेळी नवरदेवानेही मित्रांसोबत जोरदार डान्स केला. नवरदेवाचा हा डान्सच नेमका त्याच्या सासऱ्याला खटकला.
नवरदेवाची खिल्ली उडवली
नवरदेवाचा हा डान्स पाहून वऱ्हाडी मंडळी आणि पाहुण्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. नवरदेवाची सर्वचजण खिल्ली उडवत असल्याचं नवरीच्या वडिलांनी पाहिलं. त्यांना हा प्रकार बिलकूल आवडला नाही. त्यांनी हा घोर अपमान वाटला. नवरदेवाचं अशा प्रकारे डान्स करणं आणि त्यावर इतरांनी त्याची खिल्ली उडवणं हे नवरीच्या बापाच्या मनाला इतकं लागलं की त्यांनी लग्नच मोडीत काढलं. ही घटना 16 जानेवारीची असल्याचं सांगितली जाते. नवरदेवाच्या डान्सचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नवरीचा बाप काय म्हणाला?
वडिलांचा निर्णय ऐकल्यावर नवरीला तर रडूच कोसळलं. तर दुसरीकडे नवरदेवानेही भावी सासऱ्याची माफी मागून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण नवरीच्या वडिलाने कुणाचंच ऐकलं नाही. त्यांनी लग्न रद्दच करून टाकलं. नवरदेवाच्या या वेडगळपणाच्या नृत्यामुळे कुटुंबाच्या सन्मानावर लोक सवाल करतील, असं नवरीच्या वडिलांचं म्हणणं होतं.
खरं तर अशा प्रकारे लग्न रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही अशी प्रकरणे उजेडात आली आहेत. गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशातील चंदौलीमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. चंदौली येथे लग्नात जेवण वाढण्यासाठी उशीर झाला म्हणून नवरदेव भडकला आणि त्याने थेट लग्नच मोडलं. त्यानंतर त्याने घरी येऊन नात्यातील मुलीशी निकाह लावला होता. हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर त्याने नवरीकडच्यांना आर्थिक भरपाई करून दिली होती.