छगन भुजबळ आले अन् 2 तासांत गेले:राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला नावाला हजेरी; मी श्रद्धेने वागलो, पण अश्रद्धेची वागणूक मिळाल्याचा आरोप
7 hours ago
1
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीत सुरू आहे. या शिबिराला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी हजेरी लावली. पण अवघ्या 2 तासांतच ते आल्यापावली परत गेले. यामुळे ते पक्षाच्या नेतृत्वावर अद्याप नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भुजबळांनी मी पक्षात श्रद्धेने वागलो, पण मला अश्रद्धेची वागणूक देण्यात आली असा आरोपही केला आहे. छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे चांगलेच नाराज झालेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी 'जहां नहीं चैना वहां नहीं रहना' असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते. यामुळे ते राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील अधिवेशनाला हजर राहणार किंवा नाही याविषयी संशय व्यक्त केला जात होता. पण आज त्यांनी काही वेळासाठी का होईना या अधिवेशनाला हजेरी लावून माघारी परतणे पसंत केले. छगन भुजबळ सकाळच्या सत्रात गळ्यात अजितपर्वचे ओळखपत्र घालून अधिवेशनाला आले. पण त्यांना तिथे फारसे करमले नाही. त्यानंतर अवघ्या 2 तासांतच त्यांनी अधिवेशनातून काढता पाय घेतला. यावेळी जाताना त्यांनी माध्यमांशी संक्षीप्त संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना तुमचा पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याशी संवाद झाला का? असा प्रश्न केला. त्यावर बोलताना त्यांनी नाही असे प्रत्युत्तर दिले. मी पक्षाशी श्रद्धेने वागलो, पण मला अश्रद्धेची वागणूक देण्यात आली, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांची देहबोली पाहता त्यांची नाराजी कायम असल्याचे स्पष्ट झाले. भुजबळांची नाराजी टोकाची नाही - प्रफुल्ल पटेल दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसेच नेते प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळांची नाराजी टोकाची नसल्याचे स्पष्ट केले. माझी व भुजबळांची भेट झाली. त्यांचा विषय आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. या प्रकरणी कोणतीही टोकाची नाराजी नाही. भुजबळ निश्चितच आमच्या पक्षाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे मार्गदर्शन पक्षासाठी आवश्यक आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकजूट आहोत, असे ते म्हणाले. कुठे सुरू आहे राष्ट्रवादीचे अधिवेशन? राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे 2 दिवसीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिर्डीच्या पुष्पक हॉटेलात हे अधिवेशन सुरू असून, या संपूर्ण परिसराला यशवंतराव चव्हाण नगरी असे नाव दे्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी अजित पवार यांची आकर्षक रांगोळीही काढण्यात आली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)