बॉलिवूड इंडस्ट्रीत असे निवडक कलाकार आहेत, जे खूप मोजक्या चित्रपटांमध्ये काम करतात. मात्र त्यातही ते आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडतात. हे कलाकार त्यांच्या प्रतिभेसाठी सर्वाधिक ओळखले जातात. या निवडक कलाकारांमध्ये अभिनेता अक्षय खन्नाचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘हलचल’, ‘रेस’, ‘ताल’, ‘इत्तेफाक’, ‘दृश्यम 2’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. अक्षयला फारसं प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडत नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं.. हा जणू त्याच्या आयुष्याचाच मंत्र आहे. आता हाच अक्षय आगामी ‘छावा’ या चित्रपटातून अत्यंत वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो औरंगजेबाची भूमिका साकारतोय. लाइमलाइटपासून दूर असलेल्या अक्षयला त्याचं खासगीपण जपायला खूप आवडतं. तो लवकरच वयाची पन्नाशी गाठणार आहे, मात्र अद्याप त्याने लग्न केलं नाही. यामागचं कारण त्याने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय लग्नाबद्दल म्हणाला, “मी स्वत: विवाहित या दृष्टीकोनातून पाहू शकत नाही. सोप्या भाषेत बोलायचं झाल्यास मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलोच नाही. लग्न ही एक कमिटमेंट असते, ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात बरेच बदल होतात. लग्नामुळे बरंच काही बदलतं. मला माझं आयुष्य माझ्याच नियंत्रणात असलेलं आवडतं. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता, तेव्हा स्वत:च्या आयुष्यावर तुमचं संपूर्ण नियंत्रण राहत नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते.”
इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी लग्न न करता मुलांना दत्तक घेतलंय किंवा सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. अक्षयचा भविष्यात असा काही विचार आहे का, असाही प्रश्न या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिलं, “मी त्या आयुष्यासाठी तयार नाही. मला माझं आयुष्य कोणासोबत शेअर करायचं नाही. मग ते लग्न असो किंवा मुलंबाळं असो. त्यांच्यामुळेही तुमच्या आयुष्यात बरेच बदल होतात. आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीमुळे जे बदल होतात, ते मला नकोय. मला जे हवंय, ते त्यातून मिळणार नाही.”
हे सुद्धा वाचा
अक्षयचा ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमधील औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षयचा लूक पाहून चाहते अवाक् झाले आहेत. औरंगजेबाची भूमिका तो मोठ्या पडद्यावर कशी साकारतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर एका मुलाखतीत म्हणाले, “अक्षय मितभाषी आहे, पण त्याचा स्वभाव खूप चांगला आहे. तो मोजकेच चित्रपट करतो, पण अत्यंत मन लावून काम करतो.”