जाणत्या राजाला राज्यातील जनतेनेच घरी बसवले:भावी आता झाले माजी, लोणी बुद्रूक येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार

2 hours ago 1
अहिल्‍यानगरची जनता ही महायुतीच्‍याच पाठीशी आहे, हे विधानसभेच्‍या निकालाने सिद्ध करून दाखवले. निवडणूकीच्‍या निमित्ताने महाविकास आघाडीने खोटे नरेटिव्‍ह पसरवण्‍याचे काम केले. मात्र, सुज्ञ जनतेने त्‍यांना थारा दिला नाही. जाणत्‍या राजांनीही या जिल्‍ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍यांनाही जनतेने घरी बसवले. भावी म्‍हणून मिरवून घेणाऱ्यांनाही जनतेने आता माजी केल्‍याचा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे यांनी शरद पवार व माजी आ. थोरात यांना लगावला. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर लोणी बुद्रुक ग्रामस्‍थांच्‍या वतीने आयोजित सत्‍कार समारंभात विखे बोलत होते. तत्‍पूर्वी त्‍यांची शहरातून मिरवणूक काढण्‍यात आली. प्रवरानगर येथे जाऊन मंत्री विखे यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतींना अभिवादन करण्यात आले. सत्‍काराला उत्तर देताना मंत्री विखे यांनी आघाडीच्‍या नेत्‍यांवर जोरदार टीकास्‍त्र सोडले. ते म्हणाले, की केवळ दिशाभूल करणारी वक्‍तव्‍ये करुन, राज्‍यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्‍याचे काम लोकसभा निवडणुकीत केले. परंतु, विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आलेल्‍या सरकारमध्‍ये कुठेही घटना बदलली नाही आणि आरक्षणही रद्द केले नाही. अशा खोट्या नरेटिव्‍हला जनतेने या विधानसभा निवडणुकीत कुठेही थारा दिला नाही. त्‍यामुळेच महाराष्‍ट्रातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक पाठबळ देऊन पुन्‍हा एकदा सरकार स्‍थापन करण्‍याची संधी दिल्‍याचे त्‍यांनी सांगितले. महायुतीच्‍या योजनांना बदनाम करण्‍याचे काम, तसेच जातीयवादातून सामाजिक मतभेद निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न आघाडीच्‍या नेत्‍यांनी केला. त्या सर्वांनाच जनतेने मतदानातून चपराक दिली. शिर्डी विधानसभा मतदारसंघातही जाणते राजे आले. खोटे आरोप करुन, संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केला, पण शिर्डीच्‍या सुज्ञ जनतेने त्‍यांना कुठेही थारा दिला नाही, कारण वर्षानुवर्षे जिल्‍ह्यात एकमेकांमध्‍ये झुंजी लावण्‍याचे काम त्‍यांनी केले. कुटुंबा-कुटूंबात भांडणे लावली. या जिल्‍ह्याचा केवळ राजकारणासाठी वापर करुन घेतला. चार वेळा मुख्‍यमंत्री राहूनही निळवंडेचे काम यांना पूर्ण करता आले नाही. त्‍यांच्‍याही खोट्या भूलथापांना आता जनतेने टोलवले आहे. आता जिल्‍ह्यातच काय, राज्‍यातही त्‍यांना फिरण्‍याची संधी राहिली नाही. त्‍यांनी आता घरात बसून आराम करावा, असा टोला त्यांनी लगावला. संगमनेर, पारनेरला जनतेने चांगलाच धडा शिकवला विखे म्हणाले, राज्‍यात अनेक भावी मुख्‍यमंत्री तयार झाले होते. त्‍यात आपल्‍या जिल्‍ह्यातीलही एक होते, पण या भावींना आता जनतेने माजी करून टाकले. शिर्डीच्‍या पवित्र भूमिला अपमानित करण्‍याचे काम शेजारच्‍या नेत्‍यांनी केले, पण खरी दशहत कुठे होती, हे उघड झाले. पारनेरच्‍या बाबतीतही हेच घडले. केवळ विखे परिवाराची बदनामी करुन, राजकारण करू पाहणाऱ्यांना जिल्‍ह्याने चांगलाच धडा शिकवल्याचे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article