स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचंही शूटिंग पार पडलं. मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले यांच्या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. अनिरुद्धची भूमिका साकारणारे मिलिंद सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून ते चाहत्यांसोबत विविध पोस्ट शेअर करत असतात. आता मालिकेचं शूटिंग संपल्यानंतर आपलं सामान घेण्यासाठी ते जेव्हा सेटवर पोहोचले, तेव्हा तिथलं चित्र पाहून ते भावूक झाले होते. याबद्दलची अत्यंत भावनिक पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिली आहे. ‘गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू, प्रोजेक्टर गुंडाळून ट्रकमध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे, तसंच हा ‘समृद्धी’ बंगल्याचा सेट पाडून, नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत बहुतेक,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.
मिलिंद गवळी यांची पोस्ट-
’19 नोव्हेंबरला 2024 ‘आई कुठे काय करते’चं रात्री खूप उशिरा शूटिंग संपलं. 20 तारखेला मतदान आणि 21 तारखेला ‘आता होऊ दे धिंगाणा 3’चं ‘आई कुठे काय करते’च्या सहकलाकारांसोबत शूटिंग होतं. म्हणून मग 22 तारखेला म्हणजेच काल माझ्या मेकअप रूममध्ये माझं राहिलेलं काही सामान घेण्यासाठी मी शेवटचं ‘समृद्धी’ बंगल्यामध्ये गेलो. बंगल्याच्या सेटिंगचा जो भाग होता त्याचं तोडायचं काम चालू होतं. मला आमचा ‘समृद्धी’ बंगला आधी ओळखूच नाही आला, हीच का ती वास्तू जिथे आम्ही पाच वर्षे स्वतःचं घर समजून बिनधास्त वावरत होतो. गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू, प्रोजेक्टर गुंडाळून ट्रकमध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे, तसंच हा ‘समृद्धी’ बंगल्याचा सेट पाडून, नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत बहुतेक.’
हे सुद्धा वाचा
‘आज त्या बंगल्याकडे बघताना खूप वाईट वाटलं, DKP चे राजन शाही सर आणि स्टार प्रवाह यांनी मिळून किती सुंदर ‘समृद्धी’ बंगला बांधला होता. अगदी पाच वर्षे खरोखर एक सुंदर घर वाटत होतं. त्यातली माणसं खरी खरी वाटत होती आणि आज काही क्षणातच त्यातली सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली. एका क्षणात ते घर नव्हतं तर एक सेट होता हे प्रकर्षाने जाणवलं. यालाच जीवन ऐसे नाव म्हटलं जातं बहुतेक. आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर सुंदर गणपतीच्या मुर्त्या बनवल्या जातात, रोज तिची आराधना पूजा केली जाते आणि काही दिवसांनी ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केली जाते. तसंच काहीसं सिनेमांचं आणि मालिकेंचं होत असावं.’
‘खरंतर हे मला खूप वर्षांपूर्वी जाणवलं होतं, हे एक काल्पनिक जग आहे, भ्रामक जग आहे. एका लेखकाच्या कल्पनेत एक कुटुंब येतं, एक कथा येते. त्या कुटुंबाला शोभणारं घर मग आर्ट डायरेक्टर तयार करतो. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करून त्या घरामध्ये आणतो. स्वयंपाक घर, देवघर, हॉल, बेडरूम… कोणाला विश्वास बसणार नाही पण या ‘समृद्धी’ बंगल्यामध्ये 40 लोकेशन तयार केली गेली होती. अक्षरशः कोर्ट रूम पण, पोलीस स्टेशन, सगळे ऑफिसेस, आश्रम, हॉस्पिटल्स. 90% शूटिंग आम्ही या बंगल्यातच केलं. फक्त गाडीतले आणि रस्त्यावरचे काही सीन्स ‘समृद्धी’ बंगल्याच्या बाहेर करत होतो. ते पण दोन चार किलोमीटरच्या परिसरात. तीन वेळा फक्त फिल्मसिटीला डी. के. पी.च्या ‘अनुपमा’च्या सेटवर आम्ही जाऊन शूटिंग केलं होतं. ‘समृद्धी’च्या सेटवरचं तुळशी वृंदावन पण तोडून टाकलं होतं. पण मी मात्र त्यातलं तुळशीचे रोप माझ्यासाठी राखून ठेवलं. ते मला हवंय असं सांगितल्यावर कोणीही नाही म्हणालं नाही. ‘समृद्धी’ बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलोय,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.