वाई येथे विराट प्रचारसभेत खा. उदयनराजे भोसले यांनी उपस्थितांना संबोधित केले. Pudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 11:45 pm
Updated on
:
17 Nov 2024, 11:45 pm
वाई : ज्येष्ठत्वाच्या नात्याने आम्ही शरद पवार यांचा आदर करतो. पण कधी बोलायचं कसं बोलायचं याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे. तुम्हीसुद्धा अनेक पक्ष फोडले. तुम्ही तर स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजिर खुपसून त्यांच्याशीच गद्दारी केली. ज्या पाटील कुटुंबीयांनी जनतेसाठी आयुष्य वेचलं आहे, जनतेचं हित जपलं तो माणूस गद्दार कसा असेल? ज्या मकरंद आबांनी गावोगावी कोट्यवधीची विकासकामे मार्गी लावली. ते मकरंदआबा गद्दार कसे असतील? असा सवाल खा. उदयनराजे भोसले यांनी केला. दरम्यान, मतदारसंघाच्या विकासाचे व प्रगतीचे दुसरे नाव मकरंदआबा असल्याचे गौरवोद्गारही खा. उदयनराजेंनी काढले.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित वाई येथील सभेत ते बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, दत्तानाना ढमाळ, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, प्रमोद शिंदे, विजय नायकवाडी, सुमनकाकी पाटील, शारदा जाधव, उदय कबुले, नितीन भरगुडे-पाटील, राजेंद्र राजपुरे, अनिल सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, मागील 60 वर्षे तुम्ही सत्तेत होता तेव्हा फक्त तुम्ही घोषणांचाच पाऊस पाडला. लोकांची प्रगती होऊ दिली नाही. तुम्ही लोकांना फक्त फसवलं आहे. मकरंदआबांबद्दल तुम्ही चुकीचं बोलल्याने वाईट वाटलं. आबांसारखा काम करणारा नेता नाही. विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे व प्रगतीचे दुसरे नाव मकरंदआबा आहे. छत्रपतीच्या विचारांचा वारसा घेऊन आमची युती चाललीय. लोकांची सेवा करणे ही आमची बांधिलकी आहे. मकरंद पाटील यामध्ये कधीच कुठेच कमी पडले नाहीत. मकरंदआबांनी एवढी काम केली आहेत म्हणूनच त्यांची कॉलर तुम्ही टाईट केलीच पाहिजे. मी, आबा आणि आता नितीनकाका आम्ही तिघे या मतदारसंघांचा कायापालट करणार असल्याची ग्वाही खा. उदयनराजेंनी दिली.
आ. मकरंद पाटील म्हणाले, आज जी मंडळी निवडणुकीत उभी आहेत ती कोरोना व अतिवृष्टीत कुठे होती. मांढरदेवच्या दुर्घटनेच्या काळातही मी आमदार नसतानाही रात्रंदिवस काम केले. सध्या येथे एकाला तर हौस आहे, निवडणूक आली की एका गड्याच्या अंगात येतं आणि तो उभा राहतोय. प्रत्येकवेळी पडतोच. ना विचार ना पक्ष पण निवडणूक आली की बाबाने अर्ज भरलाच. दुसरे विरोधक अर्ज भरायच्या आदल्या दिवसापर्यंत आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते. सर्वसामान्य शेतकर्यांसाठी मंत्री पद नाकारून त्यांची मान ताठ ठेवण्याचं काम केलंय. मी स्वार्थासाठी नव्हे, तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारमध्ये गेलो. मागील 20 वर्षे मी तुमच्या संपर्कात आहे आणि आता 8 दिवसांत तुमच्या समोर आलेले विरोधक आमच्याबद्दल बोलतायत, असा टोलाही आ. मकरंद पाटील यांनी लगावला. यावेळी शारदा जाधव, विक्रम वाघ, राजेंद्र राजपुरे, अशोक गायकवाड, प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
स्व. किसनवीर आबांची सहकार मंदिरे वाचवण्यासाठीच सत्तेत : आ. मकरंद पाटील
मला आमदारकी किंवा सत्तेचा माज नाही. स्व. किसनवीर आबांनी उभारलेली सहकार मंदिरे वाचवण्यासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सत्तेत सहभागी झालो. त्यामुळे मी गद्दारी करण्याचा प्रश्नच नाही, मला सत्तेची हाव असती, तर मी कॅबिनेट मंत्री झालो असतो, असेही आ. मकरंद पाटील म्हणाले.