कुडाळ : एमआयडीसी येथे ट्रेलरखाली चिरडलेली दुचाकी. (छाया : काशिराम गायकवाड)
Published on
:
29 Nov 2024, 1:15 am
Updated on
:
29 Nov 2024, 1:15 am
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथे महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर रस्त्यालगत थांबलेला ट्रेलर न्युट्रल होऊन पुढे चालू लागला. यात ट्रेलरने तेथेच पार्क केलेल्या नव्या कोर्या दुचाकीला चिरडले. यात दुचाकीचा चेंदामेदा झाला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तेथेच वीज पोल असून या पोलाला ट्रेलर धडकला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती; मात्र सुदैवाने दुर्घटना टळली. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली.
महावितरण मार्फत भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करण्यासाठी लागणारी केबलची बंडले घेऊन सकाळी काही ट्रेलर एमआयडीसीत आले होते. हे ट्रेलर शासकीय विश्रामगृह नजिक महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर रस्त्यालगत उभे होते. यातील एका ट्रेलरचा हॅण्ड ब्रेक निसटल्याने ट्रेलर न्युट्रल होत समोर उभ्या दुचाकीला धडकला. यात नवी कोरी ज्युपीटर दुचाकी ट्रेलर खाली चिरडली.
शहरातील एका युवकाने मंगळवारीच ही दुचाकी खरेदी केली होती. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झालेे. सुदैवाने तिथे रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शिवाय तेथेच वीज पोल असून या पोलाला ट्रेलर धडकण्यापासून थोडक्यात वाचला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तेथे पादचारी नागरिक तसेच एमआयडीसीतील कामगार वर्गाची ये जा सुरू असते. परंतू अपघाता वेळी रहदारी कमी होती. घटनेनंतर ट्रेलर चालकाने पलायन केले.
अपघाताची माहीती मिळताच शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पार्सेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित विभागागाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क केला. कुडाळ पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.