भारतीय तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्यात सहभागी होत जखमी मच्छिमाराला रुग्णालयात दाखल केले आहे.Pudhari News network
Published on
:
25 Nov 2024, 6:49 am
Updated on
:
25 Nov 2024, 6:49 am
डहाणू : डहाणू तालुक्यातील खोल समुद्रात मासेमारी करणार्या राधे कृष्णा या मासेमारी बोटीवरील एक मच्छीमार इंजिन रूममध्ये पडून गंभीर जखमी झाला होता. भारतीय तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्यात सहभागी होत जखमी मच्छिमाराला रुग्णालयात दाखल केले आहे.
शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता, डहाणू येथील तटरक्षक दलाच्या स्टेशनला, राधे कृष्णा मासेमारी बोटीवरील (रजि. क्र. आयएनडी-डीडी-02-एमएम-1707) एका मच्छिमाराच्या जखमी झाल्याची माहिती मिळाली. ही बोट डहाणू खाडीच्या पश्चिमेला सुमारे 5 नॉटिकल मैल (9 किलोमीटर) अंतरावर होती. 22 नोव्हेंबर रोजी, इंजिन रूममध्ये पडल्याने जखमी मच्छिमाराच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. तीव्र वेदनेमुळे त्याला हालचालही करता येत नव्हती. परिस्थितीच्या गांभीर्यामुळे बोटीवरील सदस्यांनी 23 नोव्हेंबर रोजी भारतीय तटरक्षक दलाशी संपर्क साधला.
तटरक्षक दलाने तात्काळ आयसी-118 इंटरसेप्टर क्राफ्ट बचाव कार्यासाठी पाठवली. अवघ्या 40 मिनिटांत, म्हणजे पावणे दोनच्या सुमारास, तटरक्षक दलाने राधे कृष्णा बोटीला गाठले. जखमी मच्छिमाराला सुरक्षितपणे इंजिन रूममधून बाहेर काढून आयसी-118 क्राफ्टवर हलवले. प्रथमोपचार केल्यानंतर मच्छिमाराला डहाणू बंदरात नेण्यात आले. डहाणू बंदरावर पोहोचताच, जखमी मच्छिमाराला कॉटेज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तटरक्षक दलाने मच्छिमाराच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
सागरी सुरक्षेतील सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित
भारतीय तटरक्षक दलाने ही घटना सागरी सुरक्षेतील तातडीच्या प्रतिसादाचे उदाहरण ठरवले. समुद्रात आपत्कालीन परिस्थितींच्या वेळी तात्काळ मदतीसाठी आणि सागरी सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे भारतीय तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले. तटरक्षक दलाच्या वेगवान प्रतिसादामुळे जखमी मच्छिमाराचा जीव वाचला. ही घटना सागरी सुरक्षेतील सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित करते.