Published on
:
05 Feb 2025, 5:27 am
Updated on
:
05 Feb 2025, 5:27 am
आशिष देशमुख
पुणे : नऊ तोंडाचा रावण, राम, लक्ष्मण अन् हनुमानाचे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचे पाषाणातील शिल्पाचे, लाखो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायनासोर आणि सुमारे एक लाख वर्षांपूर्वीच्या समुद्री माशाचे जीवाश्म पुणे शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने जतन करून ठेवले आहे.
कॉलेज ऑफ इंजिअरिंग पुणे अर्थात सीओईपी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अग्रभागातच भूगर्भशास्त्र विभागाची इमारत आहे. इंग्रजांच्या काळापासून 1854 पासून हा विभाग कार्यरत असून, त्याचे 2022 मध्ये कोरोनाकाळात नूतनीकरण झाले. त्यामुळे या जुन्या मौल्यवान ठेव्याला नवी झळाळी आली आहे. या विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिष्ठाता डॉ. संदीप मेश्राम यांनी पुढाकार घेत अतिशय सुंदर शोकेस तयार करून हा मौल्यवान खजिना लोकांसमोर आणला आहे.
शेकडो जीवाश्म अन् खडकांचे नमुने
देशातील प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयात भूगर्भशास्त्र हा विषय शिकवला जातो. मात्र, असे संग्रहालय राज्यात कुठल्याही महाविद्यालयात पाहावयास मिळत नाही. या ठिकाणी डायनासोरचे लाखो वर्षांपूर्वीचे जीवाश्म जवळून पाहता येते. समुद्री माशांचे सुमारे एक लाख वर्षे जुने जीवाश्म इथे दिसते. तसेच महाराष्ट्रासह देशभरातील दगडांचे प्रकार, दगडांत उगवलेली फुले असा खजिना पाहावयास मिळतो.
वेरूळ येथून आणली शिल्पे
ही शिल्पे वेरूळ येथून इथे आणली आहेत. संग्रहालयात एका खिडकीत सुमारे दोन ते अडीच हजार वर्षे जुने दोन दगडी शिल्प आहेत. पहिल्या शिल्पात राम-लक्ष्मण हे रावणाशी युद्ध करताना दाखवले आहेत. यात रावणाला दहा ऐवजी नऊ तोंडे दाखवली. यात राम- लक्ष्मणाच्या हातातील धनुष्य विलोभनीय पद्धतीने कोरले आहे. तर दुसर्या शिल्पात हनुमान व राम-लक्ष्मण यांची भेट आहे.