शिकार की अपघात? रानडुकराची शिकार करताना झाडलेल्या गोळीत २ जणांचा मृत्यू!File Photo
Published on
:
05 Feb 2025, 7:30 am
Updated on
:
05 Feb 2025, 7:30 am
बोईसर : संदीप जाधव
रानडुकराची शिकार करताना चुकून झाडलेल्या गोळीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्यातील बोरशेती जंगलात घडली आहे. विशेष म्हणजे, ही घटना तब्बल आठ दिवस गुप्त ठेवण्यात आली होती. एका मृतदेहावर जंगलातच अंत्यसंस्कार करण्यात आले, तर दुसऱ्याच्या मृत्यूची माहिती लपवण्यात आली. मात्र, घटनेची माहिती बाहेर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर होत असल्याचे उघड झाले असून, जंगलातील शिकारींच्या टोळ्या कायद्याला धक्का देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२८ जानेवारी रोजी बोरशेती, किराट, रावते आणि आकोली गावांतील १०-१५ जणांनी मिळून रानडुकराची शिकार करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण तयारीनिशी हे शिकारी जंगलात गेले. बोरशेतीच्या जंगलातील आंब्याचे पाणी या ठिकाणी मोठे रानडुक्कर आणि पट्टेदारी वाघ पाणी पिण्यासाठी येतात, ही माहिती या शिकाऱ्यांना होती. त्यामुळे काहीजण डोंगराच्या कड्यावर आणि काही जण झाडांवर लपून बसले.
अमावास्येची रात्र असल्याने जंगलात मिट्ट काळोख होता. याचवेळी काही शिकारी जंगलात उशिरा पोहोचले. त्यांनी मोबाईलचा टॉर्च किंवा बॅटरी न लावता शांततेत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारात हालचाल झाल्याचा संशय आल्याने एका शिकाऱ्याने गोळी झाडली. ही गोळी थेट रमेश जन्या वरठा (वय ६०, रा. बोरशेती) यांच्या छातीवर लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हीच गोळी तडाखा देऊन पुढे जाऊन महालोडा नामक दुसऱ्या शिकाऱ्याच्या पायात घुसली.
घटनेनंतर भीतीने थरथरलेल्या शिकारींनी रमेश वरठा यांचा मृतदेह जंगलात गाडून ठेवण्याचा निर्णय घेतला. जखमी महालोडाला त्याच्या घरी नेण्यात आले. मात्र, गुप्तता राखण्यासाठी त्याला कोणत्याही रुग्णालयात नेण्यात आले नाही. परिणामी, ३१ जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्यावरही गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले.
ही घटना तब्बल आठ दिवस गुप्त ठेवण्यात आली. मात्र, ४ फेब्रुवारी रोजी स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत जंगलात गाडलेल्या रमेश वरठा यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
या घटनेने पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांचा अवैध वापर होत असल्याचे उघड झाले आहे. शिकारीच्या नावाखाली अशा प्राणघातक शस्त्रांचा वापर सुरू असून, कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
बोरशेतीच्या जंगलात मोठे रानडुक्कर आणि पट्टेदारी वाघ असल्याने तेथे शिकारीसाठी मोठी मागणी असते. स्थानिक शिकारी अनेकदा या भागात अवैध शिकार करत असतात. आंब्याचे पाणी हे जंगलातील एक प्रसिद्ध ठिकाण असून, प्राण्यांना पाणी पिण्यासाठी येण्याच्या वेळा शिकाऱ्यांना माहित असतात. त्यामुळेच येथे मोठ्या प्रमाणावर अवैध शिकारींचे जाळे तयार झाले आहे.
या घटनेत आणखी किती जण सामील होते? गावठी कट्टे कोठून आले? अवैध शस्त्रांचा वापर कसा आणि कुठे होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. प्रशासनाने या प्रकाराला गांभीर्याने घेतले नाही, तर जंगलात अवैध शिकार आणि गावठी शस्त्रांचा धोका आणखी वाढू शकतो.