माऊथ पब्लिसिटीमुळे चालला अन्यथा ‘फुलवंती’ गंडलाच होता, प्राजक्तावरही चिडचिड; पहिल्यांदाच गश्मीरचा मोठा खुलासा

2 hours ago 1

मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूड आणि सीरिजमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारा, रिअॅलिटी शोमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. गश्मीरचे जसे नवनवीन हिंदी प्रोजेक्ट येत आहेत तसेच मराठीही चित्रपटांचाही त्यांने धमाका लावला आहे. त्याचा प्राजक्ता माळीसोबतचा ‘फुलवंती’ हा चित्रपट प्रचंड गाजला.

चित्रपटाप्रमाणे त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात गश्मीरने महापंडित शास्त्रींची भूमिका साकारली होती. प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ची मुख्य भूमिका साकारली होती. प्रवीण तरडे यांनी सिनेमाचे लेखन केले होते तर स्नेहल तरडेने सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. सिनेमातील गश्मीरच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्याने ती भूमिका उत्कृष्टरित्या निभावली.

गश्मीर त्याच्या भूमिकेबाबत काटेकोर असतो

गश्मीर हा त्याच्या अभिनयाबाबत, त्याच्या भूमिकेबाबत फार मेहनत घेतो, अभ्यास करतो. त्याला त्याबाबत कोणतीही हयगय चालतं नाही. हे त्याने अनेकदा सांगितलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता आणि गश्मीरच्या अनेक मुलाखती झाल्या. अशीच एक मुलाखत गश्मीरचीही झाली होती. या मुलाखतीत ‘फुलवंती’ च्या प्रोसेसबद्दल आणि यशाबद्दल तो भरभरून बोलला. एवढच नाही तर, यावेळी त्याने सिनेमाच्या प्रदर्शनाबाबतही झालेल्या काही चुकाही स्पष्टपणे सांगितल्या.

‘फुलवंती’ च्या यशाबद्दल गश्मीरने पहिल्यांदाच स्पष्टच मत मांडलं

गश्मीर जेव्हा ‘फुलवंती’ च्या यशाबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा त्याने स्पष्टपणे आपलं मत मांडलं होतं. तो म्हाणाला की, “मला वाटते तो सिनेमा मर्यादित प्रेक्षकांसाठीच बनवला होता. त्या प्रेक्षकांनी तो स्वीकारला. त्यामुळे सिनेमा चालला. माझ्यासाठी तो चाललेला सिनेमा आहे. आर्थिक गणिते सरळ मांडली तर मी निर्माती प्राजक्ताला प्रत्येक दिवसाचा खर्च मी विचारला होता. पहिल्या शेड्युलला 16 दिवसांसाठी 8 ते 10 लाख खर्च आला. दरबारातील भव्य दृश्यांचा 9 दिवसांसाठीचा प्रत्येक दिवसाचा खर्च 14-15 लाख होता. पोस्ट प्रोडक्शन 3 कोटी, प्रसिद्धी 75 लाख. प्रदर्शनापर्यंत एकूण 4 ते सव्वा 4 कोटी एवढं बजेट झालं.”

माऊथ पब्लिसिटीमुळे चित्रपट चालला

तो पुढे म्हणाला, “पुण्यातील शनिवारवाड्यात घडलेली कथा, महापंडित आणि नाचणाऱ्या बाईमधील अव्यक्त प्रेम. यात दोघांचे कोणतेही रोमँटिक दृश्य नाहीत. म्हणजे पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, वाशी, डोंबिविली, पनवेल येथील प्रेक्षक कथेशी जास्त जोडले जाणार होते. बाबासाहेब पुरंदरे यांचीही यामागे पुण्याई आहे. त्यांनी लिहिलेली कादंबरी अनेकांनी वाचलेली होती. पण फुलवंतीच्या प्रदर्शनाचा दिवसच गंडलेला होता. सिनेमा हा नवमीला प्रदर्शित झाला. सण असल्याने नवमी आणि दसऱ्याला लोकांनी सिनेमा पाहायला जाण्यास नकार दिला होता. तो खरं तर आमचा पहिला वीकेंड होता. पण आपले प्रेक्षक नवमी-दसर्‍याला बाहेरच पडणार नाहीत. पण तरी तो माऊथ पब्लिसिटीमुळे चालला. सिनेमाची कमाई 7 कोटींच्या घरात होती. ती तेवढीच होणार होती. नवमीच्या प्रदर्शनाची चूक झाली नसती तर कदाचित चित्रपटाने 8 कोटी कमाई केली असती. पण तरी मर्यादित प्रेक्षकांसाठी 4 कोटींत बनलेला सिनेमा 7 कोटी कमावतो तर तो यशस्वीचआहे.”

असं म्हणत गश्मीरने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचा घोळ आणि त्यामुळे चित्रपटाच्या कमाईला बसलेला फटका, यासर्वांवरच तो स्पष्टपणे बोलला.

प्रसिद्धीच्या दृष्टीने सिनेमा खूप गंडलेला

गश्मीर पुढे म्हणाला “सिनेमा अॅमेझॉनवरही खूप चालला. ट्रेलरच लोकांना खूप आवडला. खरं सांगायचं तर फुलवंतीची बरीच गणिते चुकलेली होती. 11 ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होणार होता. 4 ऑक्टोबरला ट्रेलर आला. ट्रेलर किमान 15 दिवस आधी यायला हवा होता. प्रवीणचे लेखन, सिनेमॅटोग्राफी, गाणी, शास्त्री आणि फुलवंतीचे समीकरण हे सगळ्यांना आवडले. लोकांना सिनेमा आवडला. पण तसं बघायला गेलं तर प्रसिद्धीच्या दृष्टीने सिनेमा खूप गंडलेला आहे.” असं स्पष्ट मत गश्मीरने मांडलं आहे.

“प्रसिद्धीच्या वेळी प्राजक्तावर अनेकदा चिडचिड व्हायची”

तसेच पुढे प्राजक्ताच्या काही गोष्टींवरही त्याने भाष्य केलं. तो म्हणाली की, ” सिनेमाची प्रसिद्धी जशी व्हायला हवी होती त्यापेक्षा 65 टक्केच झाली. 35 टक्के कमी पडली. अनेक गोष्टी उशिरा झाल्या. प्राजक्ताची पहिली निर्मिती त्यात तीच फुलवंती त्यामुळे तिच्यावर खूप दडपण होतं. पण मला तिचा अभिमान वाटतो तिने छान पुढे नेलं. प्राजक्ताची फक्त एक चूक आहे ती म्हणजे तिला वेळेचं अजिबात भान नाही. माझी प्रसिद्धीच्या वेळी अनेकदा त्यावरून तिच्यावर चिडचिड व्हायची. ती प्रत्येक ठिकाणी उशीरच लावायची. प्रसिद्धीसाठी प्रोडक्शनची गाडी असते. त्यामुळे उशीर झाला तर त्यांचा खर्च वाढतो. माझ्या चिडचिडीमुळे मग तिचं उशिरा येणं हळूहळू कमी झालं.” असंही गश्मीरने म्हटलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article