Maharashtra Kesari 2025: पुण्याचा मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’Pudhari
Published on
:
05 Feb 2025, 7:27 am
Updated on
:
05 Feb 2025, 7:27 am
पौड : मुठा (ता. मुळशी) येथील पृथ्वीराज मोहोळ हा अहिल्यानगर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत या वर्षीचा ‘महाराष्ट्र केसरी 2025’ किताबाचा मानकरी ठरला. त्याच्या रूपाने ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब मिळविण्याचे मोहोळ कुटुंबाने पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण झाले. त्याच्या रूपाने तमाम मुळशीकरांचे स्वप्न देखील पूर्ण झाले.
कुस्ती, मोहोळ परिवार आणि मुठा गाव हे एक अतूट नाते आहे. कुस्तीला राजाश्रय देण्याचे काम याच गावातील स्व. मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना करून दिले. आजतागायत ‘महाराष्ट्र केसरी’च्या किताबासाठी बक्षीस म्हणून दिली जाणारी मानाची चांदीची गदा ही मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाते. त्याच मामासाहेबांच्याच मुठा गावातील गावकी आणि भावकीतील असलेला तरुण, तडफदार मल्ल पृथ्वीराज याने या ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेवर नाव कोरले आहे. कुस्तीचा वसा आणि वारसा लाभलेल्या पृथ्वीराजने यशस्वी वाटचाल करत यशाला गवसणी घातली.
त्याचे आजोबा अमृता मोहोळ हे मोठे मल्ल होते. मुलतानी डावासाठी प्रसिध्द असलेल्या अमृता मोहोळ यांनी पुणे महापौर केसरी, मुंबई महापौर केसरी, नाशिक महापौर केसरी हे किताब मिळवले होते. राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरीच्या जोरावर जर्मनीमध्ये झालेल्या वरिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 1989- 90 मध्ये वर्धा येथे झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या स्पर्धेत अंतिम लढत दिली होती. त्यांना विजयी जाहीर केले होते; मात्र, त्या वेळी मोठा वाद झाल्याने या लढतीचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तेव्हापासून मोहोळ कुटुंब ‘महाराष्ट्र केसरी’च्या प्रतीक्षेत होते. पृथ्वीराज याचे वडील राजेंद्र मोहोळ यांना सन 1999 मध्ये नागपूर येथे झालेल्या उपांत्य सामन्यात माती विभागात पराभूत व्हावे लागले होते. पृथ्वीराज याचे चुलते सचिन मोहोळ यांनाही गोंदिया येथे झालेल्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. दुसरे चुलते सागर मोहोळ यांना बालेवाडी येथील सामन्यात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आजोबांनंतर वडील व दोन चुलत्यांच्या पराभवाची सल या वेळी दूर करण्यात पृथ्वीराज याला यश आले आहे.
‘महाराष्ट्र केसरी’चा किताब मिळविण्याचे माझ्या आजोबांचे स्वप्न होते. माझ्या रूपाने परिवाराचे स्वप्न, वडिलांचे स्वप्न आज पूर्ण केल्याचे मोठे समाधान आहे. माझे स्वप्न यापेक्षाही खूप मोठे आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी मेहनत सुरू केली आहे.
पृथ्वीराज मोहोळ, महाराष्ट्र केसरी 2025
मीसुद्धा ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब मिळविण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी मेहनत करत मी उपांत्य फेरीपर्यंत पोहचलो होतो. परंतु, यश मिळाले नाही. माझ्या मुलाने आज माझे स्वप्न पूर्ण केले, याचा मला मनस्वी आनंद आहे.
राजेंद्र मोहोळ, पृथ्वीराज याचे वडील