कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत आता बाल गणेशाच्या अनेक लीला बघायला मिळणार आहेत. ज्यामधून पुढे त्यांचं कुटुंब एकत्र येणार आहे. पण हे करत असताना बालगणेश वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या गावी परत जाण्याचा विचार करतात. मात्र देवी भवानीशंकर यांना सांगण्याचा प्रयत्न करते की गणेश एकटा जाणार नाही आणि आपल्यात झालेल्या वादाचा राग त्याच्यावर काढू नये. दुसरीकडे अशोकसुंदरीच्या मदतीने गणेश एक वाडा बांधण्याची कल्पना मांडतो, पण देवी स्पष्ट शब्दांत नाकारते. पद्महंसा जेव्हा या नकारामागील कारण विचारते, तेव्हा देवी तुळजाभवानी अत्यंत सुंदररित्या तिचा दृष्टिकोन समोर मांडते.
तिचं म्हणणं आहे की, “स्त्रीला कुठल्याही लोकात तिच्या स्थानासाठी संघर्ष हा करावा लागतोच. ते असं कोणालाच दिलं जात नाही, ते आपण स्वतःच निर्माण करायचं असतं. स्त्री ही केवळ आई, पत्नी, मुलगी नाही, तर ती स्वतः एक शक्ती आहे. पण जोपर्यंत ती स्वतःचं स्थान ओळखत नाही, तोपर्यंत समाज तिला परावलंबी ठरवतो. कुटुंब ही आपली जबाबदारी आहे, पण स्वतःचं अस्तित्व विसरणं हा त्याग नाही तर ती एक चूक आहे. कारण जी स्वतःला विसरते, तिचं अस्तित्वही जग विसरतं. स्त्रीला कोणत्याही चौकटीत अडकवायचं नाही. तिने स्वतःचं विश्व निर्माण करायचं, स्वतःचा मार्ग निवडायचा. स्वतःच्या सन्मानासाठी उभी राहायचं. कैलासात तर माझं घर आहे पण घरासाठी मी पृथ्वीवर आले नसून इथे स्थानासाठी आलो आहोत. हा अवतार घेण्यामागे एक कारण आहे.”
हे सुद्धा वाचा
यातून आताच्या स्त्रीला अतिशय सुंदर असा संदेश देण्यात आला आहे जो प्रत्येक स्त्रीने आत्मसात करायलाच हवं. आता ही गोष्ट पुढे कशी जाणार, कसं देवीला स्वतः चं स्थान मिळणार हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. दुसरीकडे, बालगणेश तुळजा आणि महादेव यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठीच गणेश देवीकडे येऊन परिसराबद्दल विचारतो आणि देवी तुळजाभवानी रूपात त्याला परिसर दाखवायला निघते.
अशोकसुंदरी महादेवांना एका अंधाऱ्या गुहेतील कुंडाबद्दल सांगून त्यांना मूळ रूपात सोबत येण्यास राजी करते. परिसर दाखवताना देवी एक अनोळखी गुहा पाहून आश्चर्यचकित होते. गणेश आपल्या वाकचातुर्यचा उपयोग करत आई तुळजाला त्या गुहेत एकटी पाठवण्यात यशस्वी होतो. तर दुसरीकडे, महादेव गुहेपाशी आल्यावर गणेशाला कैलासावर न परतण्याबद्दल विचारतात. गणेश गुहा पाहण्याचा आग्रह धरतो, गणेश आपल्या या युक्तीमध्ये यशस्वी होईल का, महादेव आणि आई तुळजा यांची अखेर भेट अखेर होणार का, याविषयीची उत्कंठावर्धक कथा प्रेक्षकांना ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत दररोज रात्री 9 वाजता पहायला मिळेल.