पौड : पुणे-कोलाड महामार्गावर मुळशी धरण भागात गोनवडी येथे एसटीने दुचाकीला जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि. 2) रात्री सव्वाआठच्या सुमारास हा अपघात घडला. अमित यशवंत भालेराव (वय 27, रा. पिंपरी, ता. मुळशी) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याचा चुलत भाऊ गौतम रघुनाथ भालेराव याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली.
रविवारी (दि. 2) अमित भालेराव हा पिंपरी या त्याच्या गावी जाण्यासाठी पुणे बाजूने कोकणकडे चालला होता. रोहा-पुणे-अक्कलकोट एसटी बस (एमएच 06 बीडब्ल्यू 8439) कोकण बाजूने पुण्याकडे चालली होती. गोनवडी (ता. मुळशी) गावच्या हद्दीत हॉटेल मुळशी लेकजवळ आल्यावर भरधाव एसटीने दुचाकीवरील अमितला समोरासमोर जोराची धडक दिली. एसटीने दिलेली धडक इतकी जोरात होती की, अमितच्या पायाचा तुकडा पडला व तो गंभीर जखमी झाला.
स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला पौड रुग्णालयात नेले. परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर एसटीचालकाने एसटी न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्थानिक तरुणांनी एसटीचा पाठलाग केला. तरुणांनी गाडी एसटीला आडवी घालून थांबवली. परंतु, चालक पळून गेला. पौड पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.