शिवनाकवाडीत अन्नपदार्थातून विषबाधा; ७०० जणांना त्रास, २०० जणांवर उपचार सुरूFile Photo
Published on
:
05 Feb 2025, 9:49 am
Updated on
:
05 Feb 2025, 9:49 am
कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
शिवनाकवाडी ता. शिरोळ येथे मोठी विषबाधेची घटना घडली आहे. यात्रेतील अन्नपदार्थातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी अन्न पदार्थातून विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे. तब्बल 700 हुन अधिक नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. सद्यस्थितीत रुग्णालय अतिदक्षता विभागात 3 जणांवर उपचार सुरू आहेत. 187 जणांवर प्राथमिक उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आणखीन आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान कुमार विद्या मंदिर येथे विषबाधा झालेल्या रुग्णांवर औषध उपचार सुरू आहेत, तर काही रुग्णांवर इचलकरंजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवनाकवाडी गावची यात्रा सुरू असून, आज पहाटे 4 वाजल्यापासून अचानक ग्रामस्थांना उलटी- संडास- मळमळ असा त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेंव्हा त्यांना विषबाधा झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर गावातील आणखीन काही ग्रामस्थांना त्रास जाणवू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गर्दी केली असता यात्रेतील अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाने स्पष्ट केली आहे.
गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात तसेच अन्य आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी सांगितले की, विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न औषध प्रशासन विभागातर्फे तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यात्रेत स्टॉलवरील खाद्यपदार्थांमध्ये काही समस्या असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसरातील अन्नपदार्थ तपासणीसाठी नमुने घेतले असून त्यांचे अहवाल लवकरच हाती येण्याची शक्यता आहे.
या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, यांनी शिवनाकवाडीला भेट दिली. त्यांनी रुग्णांची विचारपूस केली व आरोग्य विभागाला त्वरित आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तहसीलदार अनिल कुमार हेळकर माजी आमदार उल्हास पाटील अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, सपोनी रविराज फडणीस, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी शिवनाकवाडीला भेट देऊन रुग्णांची माहिती घेतली आहे. याबाबत रुग्णांची वाढच होत चालली असून आरोग्य विभाग गतिमान झाले आहे.
तालुका आरोग्य विभागाचे पाचशे कर्मचाऱ्यांचा घरोघरी सर्वे सुरू
तालुका आरोग्य विभागाने 500 कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून शिवनाकवाडी गावातील घरोघरी फिरून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करत आहेत. लक्षणे आढळून येणाऱ्यांवर तात्काळ औषध उपचार केले जात आहेत.