कामाख्या मंदिर, वर्षा भंगला, रेड्याचे शिंग, अंधश्रद्धा हे सध्या राजकारणातील परवलीचे शब्द झाले आहेत. रोज सकाळी त्यावरून खासदार संजय राऊत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावर का जात नाहीत, म्हणून त्यांनी चिमटा काढला. त्यावर आता शिंदे गोटातून जहाल प्रतिक्रिया आली आहे. राऊतांवर टीका करताना मंत्री संजय शिरसाट यांची जीभ घसरली आहे.
शिरसाट यांची जीभ घसरली
कुंभमेळ्यात जाऊन किती भाविक मेले ते मोदी सरकारने पाहिलं पाहिजे होतं, असं राऊत म्हणाले होते. त्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या वेळी जायला पाहिजे होते. तिथे त्यांच्या अंगावर सर्वजण पडले असते आणि राऊत चेंगरले असते तर कमीत कमी शहीद झाले असते, असे ते म्हणाले. रोज तोंडातील घाण पसरवण्यापेक्षा गंगेत गेला असं तरी सांगितलं गेलं असतं. पण दुर्देव आहे. आम्हाला ती संधीही त्यांनी दिली नाही, असे वक्तव्य शिरसाट यांनी केले.
हे सुद्धा वाचा
संजय राऊतांना इशारा
रेडे आणि शिंग तिथे आहे म्हणतात. मलाही बंगला नाही. मग माझ्या इथेही रेड्याचे शिंग आहेत का. असे विधानं करणं थांबवलं पाहिजे, असे आवाहन शिरसाट यांनी राऊतांना केला. तुम्हाला वाटतं तुम्ही विद्वान आहात. पण लोकं तुम्हाला मूर्खात काढतात हे सत्य आहे. अशा पद्धतीने बोलून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसवरणं तुमच्या अंगलट येईल. लोकं आणि सरकार तुमचा बंदोबस्त करेल, असा इशारा त्यांनी राऊतांना दिला.
उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे यांनी सुरज चव्हाण यांचे कौतुक केल्यावर शिरसाट यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्याचं कौतुक करण्याचं कारण सुरज चव्हाण स्वत: मातोश्रीवर जाऊन भेटला. जर हे एक दिवस जेलमध्ये जाऊन सूरजला भेटले असते तर मी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं असतं, असं शिरसाट म्हणाले. तुम्हाला बोलायला संधी होती पण आपला कार्यकर्ता जेलमध्ये गेला. त्याला साधं भेटायला गेला नाही. सुरज चव्हाणलाही जाणीव झालीय या लोकांनी काय काय केलं. एकही रुपयांची यांनी मदत केली नाही. सूरज त्याच्या बळावर जामीनावर बाहेर आला आहे. भविष्यात त्यातून निर्दोष निघो या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.