Pune Crime : पैसे, दागिने सगळं घे पण मला सोड, जीव नको घेऊ; वृद्ध महिलेची लुटणाऱ्या युवतीला विनंती

3 hours ago 1

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून दिवस असो की रात्र, गुन्हेगार मोकाट फिरत चोरी, दरोडे टाकतच आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्याच्या म्हाळुंगे परिसरातही घडली आहे. तेथील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेवर पाळत ठेवून, तिच्या घराची रेकी करून एक तरूणी घरात घुसली. तिने त्या वृद्ध महिलेचा गळा, तोंड ओढणीने दाबत, तिला मारहाण केली आणि तिच्याकडचे सोन्याचे दागिने, पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वृद्ध महिलेने प्रसंगावधान दाखवत गॅलरीत धाव घेतली आणि बचावासाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून शेजारीपाजारी मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी हल्ला, चोरी करणाऱ्या भामट्या तरूणीला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. बावधन पोलिसांनी तिला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात, 31 जानेवारीला म्हाळुंगे परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. गजराबाई कोळेकर असे त्या वृद्ध महिलेचे नाव असून ही घटना सोशल मीडियावरही व्हायरल झाली होती. हा प्रकार नेमका का घडला, काय झालं होत, हे त्या आजीबाईंनी स्पष्ट सांगितलं. त्यांच्या सांगण्यानुसार, ही तरुणी वयोवृध्द महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर गेली. वयोवृद्ध महिलने फ्लॅटचं दार उघडल्यावर, तिच्यापाठोपाठ ती तरूणीदेखील आत घुसली आणि तिने दार घट्ट लावलं. त्यानंतर त्या आरोपी तरूणीने महिलेवर हल्ला केला.

तिच्या ओढणीने आणि वृद्ध महिलेच्या पदराने, तिने तिचा गळा आवळला. तिच्यावर जीवघेणा हल्ला करत तिला बाथरूममध्ये घेऊन गेली, गळा आवळल्याने त्या महिलेचा जीव गुदमरला. नंतर त्या तरूणीने महिलेचा गळा आणखी आवळून सोन्याचे दागिने हिसकावून घेतलं. ती वृद्ध महिला त्या तरूणीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र त्या तरूणीची ताकद जास्त होती. वृद्ध महिलेचा जीव कासावीस झाला तरी ती सोडत नव्हती.

अखेर त्या महिलेने तिला विनवलं, मी तुला दागिने, पैसे सगळे देते, ते घे, पण मला सोड, माझा जीव घेऊ नको, अशी विनंती तिने केली. त्यानंतर वृद्ध महिलेने कानाला कुडक्या काढण्यास हात लावण्याचा प्रयत्न करताना समोर तिच्या फ्लॅटची काचेची खिडकी तिला दिसली. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने डायरेक्ट खिडकीवर मुसंडी मारली. मला वाचवा, मला वाचवा असे मोठयाने ओरडली. तिचा आवाज ऐकून आजूबाजीच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी दार तोडून महिलेला वाचवलं. आरोपी तरूणीला पकडून ठेवलं. आपली खैर नाही, हे लक्षात येताच त्या तरूणीने दागिने काढून परत दिले. आरोपी तरूणीला बावधन पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करत आहेत. मात्र यामुळे पुण्यातीला रहिवाशांचा, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आता पोलिस त्याबद्दल काय उपाययोजना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article