डिंगोरे परिसरात वन गाईंचा धुमाकूळPudhari
Published on
:
02 Feb 2025, 7:50 am
Updated on
:
02 Feb 2025, 7:50 am
नारायणगाव: डिंगोरे परिसरात वन गाईंनी धुमाकूळ घातला असून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने या वन गाईंचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनला दिला आहे.
जुन्नर तालुक्याच्या डिंगोरे, आल्मे, बल्लाळवाडी, घोडेमाळ, वरखडवस्ती परिसरामध्ये ५० हून अधिक वनगायी रात्री-अपरात्री पिकामध्ये घुसून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. गेले अनेक वर्ष ही समस्या स्थानिक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. परंतु कोणी या गाईंचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेत नाही.
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात असलेल्या पिकाचे गाईंनी नुकसान करू नये म्हणून लोखंडी तारेचे कंपाउंड केले आहे, तर काही शेतकरी रात्रीच्या वेळी आपल्या पिकाचं राखण करीत आहेत. दिवसभर या वनगाई डोंगरावर असतात व रात्री दहा वाजेनंतर पिकामध्ये घुसून पिकाची नासाडी करीत असतात. गहू, कांदा, हरबरा, मका मुरघास, गवार, भेंडी, फुल शेती तसेच इतर पिकाचे नुकसान करीत आहे.
दरम्यान या वनगायीमध्ये काही वळू (बैल) सुद्धा आहेत. या वनगायी व वळूचा मोठा ग्रुप आहे. यांना हूसकावण्याचा प्रयत्न केला तर ही जणांवरं शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जात असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शासनाने पशुसंवर्धन विभागाला सांगून या सर्व गाई पकडून गोशाळा अथवा पांजरपोळ या ठिकाणी स्थलांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने जुन्नर पंचायत समिती व तहसील कचेरीच्या अधिकाऱ्यांनी या भागात भेट देऊन गायींचा बंदोबस्त कसा करता येईल? याबाबतची पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी आठवड्यात चर्चा केली आहे.
दरम्यान पशुसंवर्धन विभागाने या सगळ्या गायी पकडून पांजरपोळ अथवा गोशाळा येथे हलवण्यात आल्या नाही तर संतोष उकिर्डे शिवाजी शेरकर, कुणाल लोहोटे, सुरज लोहटे , सुजित लोहटे, बाळासाहेब नायकोडी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काही वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने देवाला एक गाय सोडून दिली होती. त्या गायीच्या आता ५० हून अधिक गायी झाल्या आहेत. शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून स्थानिक शेतकऱ्यांना आता गस्त सुरू करावी लागली आहे. एकीकडे बिबट्याची भीती तर दुसऱ्याकडे या गाईंपासून पिकाचे नुकसान होण्याची भीती या दुहेरी कात्रीमध्ये सध्या परिसरातील शेतकरी सापडले आहेत.