डोंबिवलीच्या म्हात्रेनगरात पोलिसांची धाड; तंबाखुजन्य पदार्थांसह गुटखा साठा जप्तFile Photo
Published on
:
17 Nov 2024, 1:44 pm
Updated on
:
17 Nov 2024, 1:44 pm
डोंबिवली : पूर्वेकडील राजाजी रोडला असलेल्या म्हात्रेनगर भागातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये उत्तरभारतीय चौकडीचा कारनामा सुरू होता. उमद्या पिढीला उध्वस्त करण्याचा घाट घालणाऱ्या चौघा बदमाशांचा गोरखधंदा रामनगर पोलिसांनी धाड टाकून चव्हाट्यावर आणला. या धाडीत पोलिसांनी 1 लाख 64 हजार रूपये किंमतीचा प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांसह गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
पोलिसांनी कारवाई दरम्यान प्रतिबंधित वस्तूंची साठवण, विक्री आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका होईल हे माहिती असूनही या वस्तूंची हाताळणी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार राजेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रामकेवल गुप्ता, राकेश गुप्ता, शिवकुमार उर्फ शिवा आणि आतिक (पूर्ण नाव नाही) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना खासगी गुप्तहेरांकडून खास माहिती मिळाली होती. राजाजी रोडला असलेल्या म्हात्रेनगर भागात एका विक्रेत्याने प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांची साठवण करून ते पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. ही माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेगडे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधितांच्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाईचे आदेश दिले.
सहाय्यक निरीक्षक ईश्वर कोकरे, उपनिरीक्षक सूर्यवंशी, हवालदार निलेश पाटील, रोहिदास पाटील, बंडू शेळके, तुळशीराम लोखंडे, नितीन सांगळे या पथकाने म्हात्रेनगरातील जीवन छाया इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन राम गुप्ता याला रंगेहाथ पकडले. राम गुप्ता याच्या हातामधील पिशवीत पोलिसांना विमल गुटख्याची पाकिटे आढळून आली. अधिक चौकशीत त्यांनी काही साठा बंद फ्लॅटमध्ये असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचांसमक्ष फ्लॅट उघडताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पाकिटांचा गोण्यांमध्ये साठा आढळून आला. या साठ्याची एकूण किंमत 1 लाख 64 हजार रूपये इतकी आहे.
हा माल स्वत:सह राकेश गुप्ता आणि शिव कुमार यांनी विक्रीसाठी आणून ठेवल्याची कबुली राम गुप्ता याने पोलिसांना दिली. हे प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ मुंबईतल्या सॅन्डहर्स्ट रोड येथील एका विक्रेत्याकडून खरेदी केल्याचही गुप्ता याने सांगितले. कल्याण-डोबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यातील अनेक टपऱ्यांवर प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अशा प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांची वाहतूक, साठा, वितरण आणि विक्री करणाऱ्यांमध्ये अनेक बदमाशांचा समावेश आहे.