दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री अतिशी यांची निवड होण्याची शक्यता आहे. File Photo
Published on
:
08 Feb 2025, 11:21 am
Updated on
:
08 Feb 2025, 11:21 am
दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री अतिशी (Atishi) यांची निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांचे जवळजवळ संपूर्ण कल हाती आले आहेत. भाजपने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला. त्यामुळे आता मुख्यमंत्री अतिशी यांच्याकडे विरोधी पक्षनेते ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते असलेले अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज असे प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या वाट्याला येणारी 'विरोधी पक्षनेते' ही प्रमुख जबाबदारी अतिशी यांच्या खांद्यावर दिली जाऊ शकते. त्या संदर्भात एक बैठकही अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दुपारी पार पडली.
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले. तर मनीष सिसोदिया हे देखील जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाले. आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून अरविंद केजरीवाल यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्यानंतर दुसरे सगळ्यात महत्त्वाचे नेते म्हणून मनीष सिसोदिया यांना ओळखले जातात. आम आदमी पक्षाचे हे दोन्ही मजबूत स्तंभ उद्ध्वस्त करण्यात भाजपाला यश मिळाले.
दरम्यान, कालकाजी विधानसभेतून आम आदमी पक्षाच्या उमेदवार आणि मुख्यमंत्री अतिशी यांचा विजय झाला. नवी दिल्ली विधानसभेतून भाजपाचे प्रवेश सिंह वर्मा यांचा विजय झाला तर जंगपुरा मधून भाजप उमेदवार तरविंदर सिंह यांचा विजय झाला. यानिमित्ताने तब्बल २७ वर्षानंतर भाजपने दिल्लीत मोठे कमबॅक केले.