Published on
:
02 Feb 2025, 11:10 am
Updated on
:
02 Feb 2025, 11:10 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात (Mahakumbh 2025) वसंत पंचमीनिमित्त अमृत स्नानाचे आयोजन ३ फेब्रुवारी करण्यात येणार आहे. या दिवशी पवित्र स्नानाची वेळ पहाटे ५ : २३ ते ०६ : १६ वाजेपर्यंत आहे. या साेहळ्यात भाविकांच्या सुरक्षेसह अन्य कोणत्याही पातळीवर चुकीला वाव असता कामा नये, असे निर्देश देत महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी प्रकरणी जबाबदार असणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई केली जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी आज (दि.२) स्पष्ट केले. वसंत पंचमी स्नान महोत्सवाच्या तयारी आढावा प्रसंगी ते बोलत होते. (Stampede in Mahakumbh)
'चेंगराचेंगरीस जबाबदार अधिकारी-कर्मचार्यांवर होणार कारवाई'
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात २९ जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता. ६० जण जखमी झाले होते. या जबाबदार असलेले अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज स्पष्ट केले. तसेच पंचमी स्नान महोत्सवात कोणतीही त्रुटी न ठेवता व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिले. या प्रसंगी आखाड्यांची पारंपारिक मिरवणूक काढली जाईल. तत्पूर्वी संत, कल्पवासी, भक्त आणि पर्यटकांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित केली पाहिजे. कोणत्याही पातळीवर चुकीला वाव असता कामा नये, असे निर्देशही त्यांनी अधिकार्यांना दिले.
पार्किंगची जागा वाढवण्याचे आदेश
महाकुंभ मेळा परिसरातील पार्किंगची जागा वाढवावी. भाविकांना शक्य तितके कमी चालावे लागेल, अशी व्यवस्था करा. महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले. कुठेही वाहतूक कोंडी होऊ देऊ नका.वसंत पंचमीला पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमधून मोठ्या संख्येने भाविक येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे लक्षात घेऊन व्यवस्था करावी. अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली.
संतांच्या संयमासमोर सनातनविरोधक अपयशी ठरले: मुख्यमंत्री
मौनी अमावस्येच्या दुर्घटनेनंतर प्रथमच महाकुंभात पोहोचलेले मुख्यमंत्री योगी म्हणाले की, १९ दिवसांत ३२ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नानाचा योग साधला आहे. मौनी अमावस्येदिवशी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. यावेळी संतांच्या संयमासमोर सनातनविरोधी कट अपयशी ठरला आहे. मौनी अमावस्येला पूर्ण संयम दाखवणाऱ्या संतांचे मी अभिनंदन करतो. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत काही जण बळी पडले. अशा कठीण प्रसंगी संत पालक म्हणून प्रकट झाले.काही लोक सनातन धर्माच्या प्रत्येक मुद्द्यावर दिशाभूल करत आहेत. रामजन्मभूमीपासून ते आजपर्यंत त्यांचे वर्तन आणि चारित्र्य सर्वज्ञात आहे. अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे आणि सनातन धर्माचे आदर्श आणि मूल्ये घेऊन पुढे गेले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीप्रमणी दाखल जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, ही जनहित याचिका ३ फेब्रुवारीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे.
चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू
महाकुंभमेळ्यात २९ जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यू झाला होता आणि ६० जण जखमी झाले होते. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सर्व राज्यांना प्रयागराजमधील त्यांच्या सुविधा केंद्रांमध्ये भाविकांना सुरक्षा उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वांबद्दल मूलभूत माहिती देण्याचे निर्देश देण्यात यावेत,अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील विशाल तिवारी यांनी आज (दि.३०) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.