Published on
:
24 Jan 2025, 1:06 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:06 am
बेळगाव : पोटाला चिमटा लावून जमा केलेली रक्कम गोरगरीब जनता अधिक व्याजाच्या आशेपोटी खासगी बँका, फायनान्स कंपन्यांमध्ये गुंतवतात; मात्र अशा बँकांमध्ये ठेवलेली रक्कम परत मिळणे कठीण झाले आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारींची संख्या वाढली असून सर्वात जास्त बेळगाव जिल्ह्यातून पावणेतीन लाख लोकांनी तक्रारी केल्या असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सर्वात जास्त फसवणूक खासगी बँका, फायनान्समधूनच होत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण 7 लाख 80 हजारांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत सरकारने विशेष प्राधिकरण स्थापन करण्याबाबत चर्चा केली होती; मात्र अद्याप त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे महसूल खात्याने या तक्रारी पोलिसांकडे वर्ग केल्या असून त्यांच्याकडूनच अहवाल घेण्यात येत आहे. राज्यातील एकूण 127 फायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत.
आर्थिक नुकसानीचा आकडा पाहता सरकारने याबाबत गांभीर्याने विचार गरजेचे आहे; मात्र अद्याप तरी सरकारने गांभीर्य दाखवलेले नाही. यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत आली असून अनेकजण आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारू लागले आहेत. बेळगाव जिल्ह्यातून 2 लाख 71 हजार 468 तक्रारी करण्यात आल्या आहेत. बेळगावनंतर बागलकोट जिल्ह्याचा (89 हजार 37) क्रमांक लागतो. विजापूरमधून 75 हजार, मंड्यामधून 42 हजार 500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. खासगी बँक, फायनान्स, खासगी संघ यांनी ही फसवणूक केली असून त्या सर्वांच्या विरोधात या तक्रारी दाखल होत आहेत. तक्रारी दाखल केल्यानंतर तक्रारदारांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
ठेवी घेणार्यांविरोधात कारवाई करणे महत्त्वाचे आहे. महसूल विभागाने अंग झटकले असून पोलिस प्रशासनाकडे या तक्रारी वर्ग केल्या आहेत. आता पोलिस अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहावे लागेल.
मायक्रो फायनान्सपासून होणारा त्रास थांबवा
मायक्रो फायनान्स कंपन्या कर्जदार, ठेवीदारांना मानसिक त्रास देत आहेत. यामुळे सहकार क्षेत्राची बदनामी होत आहे. हे थांबविण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हावेरी येथील महिलेने पत्र दिले आहे. जनता तणावाखाली असून तातडीने याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत, असे या पत्रात म्हटले आहे.