Published on
:
18 Jan 2025, 11:50 am
Updated on
:
18 Jan 2025, 11:50 am
बीजिंग : संशोधकांना चीनमध्ये तब्बल तीन लाख वर्षांपूर्वीच्या एका मांजराच्या जबड्याच्या हाडाचे जीवाश्म सापडले आहे. ही अतिशय लहान आकाराच्या मांजरांची एक लुप्त झालेली प्रजाती आहे. ही मांजरं इतक्या लहान आकाराची होती की, ती आपल्या तळहातावर सहज सामावू शकतील. सुरुवातीच्या काळातील माणसं ज्याठिकाणी राहत होती, अशा एका गुहेत खोलवर हे जीवाश्म सापडले आहे.
याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘अॅनालेस झुलॉजिकी फेनिकी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मांजरांची ही लुप्त प्रजाती जगातील सर्वात लहान आकाराच्या मांजरांची ठरते. ही प्रजाती अंशतः बिबटे मांजर म्हणजेच लेपर्ड कॅटच्या ‘प्रायोनिलरस’ या कुळाशी संबंधित आहे. दक्षिण आशियात अद्यापही मार्जार कुळातील हे प्राणी अस्तित्वात आहेत. पाळीव मांजरांमध्ये आणि या लेपर्ड कॅटस्मध्ये बरेचसे साम्य असते. त्यांचा आकार पाळीव मांजरांसारखाच असला, तरी अंगावर बिबट्यासारखे काळे ठिपके असतात. त्यांची लांबी 28 इंच आणि वजन दोन किलोपर्यंत असते; मात्र या मांजरांपेक्षा आकाराने अतिशय लहान अशी ही तीन लाख वर्षांपूर्वीची प्रजाती होती. चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टिब्रेट पॅलिओंटोलॉजी अँड पॅलिओंथ्राेपोलॉजीमधील संशोधक किगाओ जियांगझुओ यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, लाखो वर्षांपूर्वीची ही मांजरे सुमारे एक किलो वजनाची होती. सध्याच्या काळात सर्वात लहान आकाराची मार्जार कुळातील जंगली प्रजाती म्हणून ‘ब्लॅक-फुटेड कॅट’ (फेलिस निग्रीपेस) व रस्टी-स्पॉटेड कॅट (प्रिऑनेलरस रबीजिनोसस) ला ओळखले जाते. त्यांची लांबी अनुक्रमे 35 ते 52 सेंटीमीटर व 35 ते 48 सेंटीमीटर असते. ज्या मांजराचे जीवाश्म सापडले आहे ते या मांजरांपेक्षा लहान आकाराचे होते.