तीन वेळा जीवघेणा हल्ला; बंडखोर काळूराम धोदडेंचा संघर्षमय प्रवास

1 hour ago 1

आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक काळूराम काका धोदडे यांचे निधन झाले.Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

11 Oct 2024, 1:23 pm

Updated on

11 Oct 2024, 1:23 pm

डहाणू : पुढारी वृत्तसेवा: काळूराम धोदडे यांचं नाव सर्वपरिचित आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी देखील पायाला भिंगरी असल्यासारखे ते फिरत होते. एका गावातून दुसऱ्या गावात, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात आणि संघटना किंवा आंदोलन संबंधित बैठक असल्यास अन्य राज्यातही. पालघर-ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांतील आदिवासी भागात त्याचं नाव पोहोचलं आहे. आदिवासी एकता परिषदेतर्फे अलीकडे पालघर येथे आयोजित आदिवासी महासंमेलनाने हे अधोरेखित झाले आहे.

आश्रमशाळेतच ते अकरावीपर्यंत शिकले.

पालघर तालुक्यातील मनोर जवळील कोंढाण गावात १९३६ साली त्यांचा जन्म झाला. आई-वडिलांनी पुढे त्यांना आश्रमशाळेत पाठवले. आश्रमशाळेतच ते अकरावीपर्यंत शिकले. खरंतर इथून पुढे नोकरी करून ते स्थिरावले असते. पण शालेय जीवनापासूनच बंडखोर असलेल्या काळुराम यांनी (खरे तर सारे जण त्यांना काका किंवा काळूराम काका म्हणतात) आश्रम शाळेत आणि आपल्या गावात अवती-भवती जे पाहिलं, त्या सामाजिक वास्तवानं त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. त्यांनी अकरावीनंतर जंगल कामगार सोसायटीमध्ये नोकरी स्वीकारली.

आश्रमशाळेतील गैव्यवहार चव्हाट्यावर आणला

परंतु, आदिवासींच्या उत्थानासाठी चालविण्यात येणाऱ्या या संस्थेमध्येही वेगळं काही घडत नाही, हे पाहून तर त्यांच्या बंडखोर वृत्तीने अधिकच उचल खाल्ली. आदिवासींना त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार संबंधात वैयक्तिक अर्ज लिहून देण्याचं काम करताना त्यांनी आपल्यातील या वृत्तीला शालेय जीवनातच सक्रिय केलं होतं. आश्रमशाळेत शिकत असताना त्यांनी आश्रमशाळेतील गैव्यवहार चव्हाट्यावर आणण्याचं काम केलं.

सावकाराचे कर्ज, आदिवासींच्या जमिनीचं बिगर आदिवासींकडे हस्तांतरण, घरगडी- लग्नगडी स्वरूपातील वेठबिगारी, रोजगाराअभावी बाहेर जगायला जाणं, हे आदिवासी भागातील त्यावेळचे चित्र होतं. केंद्रात व राज्यात काँग्रेसची सत्ता असली तरी तत्कालीन ठाणे जिल्ह्यात आणि विशेषत: पालघर तालुक्यात त्या काळात समाजवादी पक्षाचं मोठं काम होतं. अनेक नेते या पक्षात सक्रिय होते. यातील मोरेश्वर मेस्त्री यांच्या नजरेला हा तरुण आला. यातूनच हा तरुण समाजवादी मंडळीच्या संपर्कात आला.

तुरुंगात वैचारिक संगोपन झाले

दरम्यान, समाजवादी पक्षातर्फे भूमिमुक्ती आंदोलन करण्यात आलं होतं. काळूराम या आंदोलनात उतरले. इतर आंदोलकांच्या जोडीला काळूराम यांनाही अटक झाली. तुरुंगातील या मुक्कामात त्यांचं वैचारिक संगोपन झालं आणि त्यांना लढण्याचे धडेही मिळाले. इथून सुरू झालेल्या काळूराम यांच्या प्रवासाने गेल्या ४० वर्षांत अनेक वळणं घेतली. नेतृत्वाचे गुण त्यांच्यात होतेच, पण अनुभवातून स्वतः शिकत, स्वतःला घडवत, आपला समज आणि जाणिवांच्या कक्षा वाढवत त्यांनी आपल्यातील नेतृत्वाला समृद्धही केलं.

आदिवासींना वैयक्तिक पातळीवर मदत करत असतानाच अशा वैयक्तिक कामातून फार काही साध्य होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आणि येथूनच भूमिसेना जन्माला आली आणि पुढे त्याच्या पायाला भिंगरी लागली. बिगर आदिवासींनी आदिवासींच्या बळकावलेल्या जमिनी उभ्या पिकासह ताब्यात घेऊन काळूराम यांच्या भूमिसेनेने इतिहास घडवला. यातूनच कूळ कायद्याखालील जमिनीचे दावे महसूल कार्यालयाऐवजी थेट जागेवर चालले आणि एका दिवसात सुमारे ८०० आदिवासींना त्यांच्या गमावलेल्या जमिनीचा ताबा मिळाला. भूमिसेनेचे वेठबिगार मुक्ती आंदोलनही त्या काळात गाजले. रेती व्यवसाय उदयास आल्यानंतर त्यावरील हमाल, ड्रायव्हर अशा असंघटितासाठी मजूर संघटनाही याच दरम्यान स्थापन झाली.

काळुराम यांच्यावर  तीन वेळा जीवघेणा हल्ला 

कूळ कायद्यातून मिळालेल्या जमिनींना उत्पन्नाचं साधन बनवावं म्हणून त्या काळात शेतीचा प्रयोग झाला. मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नाही. भूमिसेनेने याच काळात जंगलावरील हक्कासाठीचा लढा लढवला. जंगलाचे आदिवासींच्या जीवनातील स्थान व महत्त्व लक्षात घेऊन जंगल बचाव आंदोलनही भूमिसेनेने छेडले. आणीबाणीत २० कलमी कार्यक्रमाला काळूरामनं शोषणकर्ते आणि प्रस्थापितांविरोधातील लढाईचे हत्यार बनवले. या लढाईत एकदा पोलिसांची अमानुष मारहाण तर तीनदा जीवघेण्या हल्ल्यांत ते बचावले.

जंगलाचा मालक जंगलातूनच बेदखल

अर्थात, दरम्यानच्या काळात औद्योगिकरण व नागरीकरणाचे परिणाम या भागात दिसू लागले होते. याचा पहिला बळी अर्थातच आदिवासी ठरत असल्याचे त्यांना दिसू लागले. धरणे, महामार्ग अशा विविध प्रकल्पांसाठी आदिवासींच्या जमिनी संपादित केल्या जाऊ लागल्या. धरणं बांधली पण या धरणाचे पाणी थेट मुंबई, वसई, भाईंदरला आणि आदिवासी मात्र पाण्यापासून वंचित. भूसंपादन तर झालं पण ना योग्य मोबदला ना योग्य पुनर्वसन. जंगलाचा मालक जंगलातूनच बेदखल होऊ लागला. आदिवासींच्या हातातून येथील जल, जंगल, जमीन आदी नैसर्गिक संसाधने हिसकावून घेतली जात आहेत. अलीकडील महामार्ग, बुलेट ट्रेन अशा विविध प्रकल्पांनी तर त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधनच नष्ट होत आहे की काय अशी भीती काळूराम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होती.

आदिवासींच्या हक्कासाठीची लढाई आदिवासींनीच लढायला हवी. त्यांचं नेतृत्व आदिवासींनीच करायला हवं, हा विचार पुढे येऊ लागला आणि यातूनच आदिवासी एकता परिषदेची स्थापना झाली. अलीकडील वर्षांत काळूराम आदिवासी एकता परिषदेचं नेतृत्व करत आहेत. आपल्या या प्रवासात त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूकही लढवली. मात्र, त्यांना यात यश आलं नाही .

आदिवासींमधील तरुण- तरुणींमध्ये प्रचंड आकर्षण

भूमिसेना ते आदिवासी एकता परिषद या प्रवासात अखेर आपल्याला खरी वाट सापडली आहे, असे ते मानतात आणि त्या वाटेवर चालण्याचा त्यांचा निर्धार आहे. चळवळीतील आपल्या ४० वर्षात ते बदलले नाहीत. आजही त्याची बँक शिल्लक शून्य असावी. कोंढाणमधील त्यांचं घर त्याची पत्नी सीमाताई सांभाळतात. मुले आपापल्या वाटेने निघाली आहेत. काळूराम यांचे वैशिष्ट्य म्हणजे आजही आदिवासींमधील तरुण- तरुणींना त्याचे प्रचंड आकर्षण आहे. अलीकडील कोणत्याही नेतृत्वाचा विचार केला तर काळूराम यांच्या नेतृत्वाचं हे वेगळेपणं उठून दिसतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article