‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ने जिंकली रसिकांची मने:दृष्टिहीन तरुण-तरुणींच्या मदतीसाठीशहरातील सांस्कृतिक भवनात घेतला प्रयोग
2 hours ago
1
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाची शाखा आणि अभिजात मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ या नाटकाचा प्रयोग सांस्कृतिक भवनात सादर झाला. राज्यातील दृष्टिहीन तरुण-तरुणींच्या रोजगार निर्मितीच्या मदतीसाठी हा प्रयोग घेण्यात आला. येथील अभिव्यक्ती या नाट्य संस्थेने प्रयोगाची निर्मिती केली होती. या नाटकात मनोज सामदेकर (वेंधळा जमादार), मंगेश बक्षी (ग्लाड), किशोर तळोकार (वीरभूषण), तुषार सोरगिवकर (सिनियर), विनायक लांजेवार (बॅनर्जी), अनिल कडू (हवालदार), संजय तिवडकर (जोजफ), नितीन शहाकार (वेडा कैदी), शुभम वैद्य (इन्स्पेक्टर), मृणाल ढोले (उमा), शुभांगी करुले-पांडे(जेनी) या कलावंतांनी उत्कृष्ट भूमिका केल्या. दिग्दर्शन, नेपथ्य मंगेश बक्षी, पार्श्वसंगीत अभिजित झाडे, प्रकाश योजना मंगेश पांडे, रंगभूषा सतीश देवरे यांची होती. अभिव्यक्ती च्या संस्थापिका मंगला बक्षी, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ शाखेचे अध्यक्ष अजय भोजने, गजानन राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नाटकाची सुरुवात झाली. नाटकाला नाट्यरसिक उपस्थित होते. मध्यवर्ती कारागृहातील जेलर ग्लाड , फाशीचा कैदी क्रांतिकारक वीरभूषण यांच्यामधील संघर्ष अनिल बर्वे यांच्या लेखणीतून या नाटकाने उभा केला . मानव जातीबद्दल चीड असणारा जेलर ग्लाड तुरुंगात नव्याने आलेल्या वीरभूषणला पहिल्या भेटीत तुडवून काढण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यात त्याला यश येत नाही. सर्जन वीरभूषणच्या तुरुंगातील वागणुकीमुळे, सरकारकडे देहदंडाची शिक्षा न देता देहदानाचे मृत्यूपत्र त्याने लिहिले असल्याने ग्लाडची अडचण होते. तो वीरभूषणकडून दयेचा अर्ज लिहून घेण्यासाठी त्याच्या मागे लागतो. पण वीरभूषण त्यासाठी तयार होत नाही. दरम्यान फाशीला चार तास शिल्लक असतानाच ग्लाडची गरोदर मुलगी जेनीला त्रास सुरू होतो. ती ग्लाडच्या सरकारी निवासस्थानी आलेली असते. पाऊस आणि वादळमुळे तुरुंगाचा शहराशी संपर्क तुटतो. त्यामुळे तिला दवाखान्यात नेणेही शक्य होत नाही. इकडे फाशीसाठी येणारे सर्जन, मॅजिस्ट्रेट आलेले नसतात. त्यामुळे जेनीच्या प्रसूतीसाठी ग्लाडतर्फे वीरभूषणला विनंती केली जाते. ही विनंती तो मान्य करून जेनीची डिलिव्हरी करतो. प्रसूतीकार्य आटोपून वीरभूषण बाहेर येतो तेव्हा फाशीची वेळ झालेली असते. त्यामुळे त्याला वधस्तंभाकडे नेत असतानाच ग्लाड वीरभूषणच्या छातीत गोळ्या घालतो. अशाप्रकारे वीरभूषणला वीरमरण देऊन ग्लाड गळ्याभोवती फास आवळतो.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)