Published on
:
26 Nov 2024, 4:21 am
Updated on
:
26 Nov 2024, 4:21 am
मुंबई : मुंबईवरील सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्याला २६ नोव्हेंबरला १६ वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यानंतर सरकारने सुरक्षिततेसंदर्भात उचललेल्या पावलांना आता मूर्त स्वरुप येताना दिसत आहे. नवी वाहने, पोलीस आणि सुरक्षा दलांना पुरवण्यात आलेली नवनवीन शस्त्रे, महत्वाच्या ठिकाणी तैनात असलेली सुरक्षा व्यवस्था, या सर्वांच्या जोडीला लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांनी मुंबईची सुरक्षा अधिक कडेकोट केली आहे. दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झालाच तर तो परतवून लावण्याची यंत्रणा तयार आहे.
राज्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाबाहेर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सज्ज असलेला जीपसारख्या वाहनांचा ताफा, त्याचबरोबर महत्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची वाढवलेली सुरक्षा, तेथे तैनात असलेले तात्काळ प्रतिसाद सुरक्षाबल, अशीच सुरक्षा व्यवस्था अनेक महत्वाच्या रेल्वे स्थानकांना पुरवण्यात आली आहे. सरकारी पातळीवर प्रत्येक ठिकाणी सुरक्षेची खबरदारी घेण्यात येत असतानाच खासगी आस्थापनांनी देखील आपापल्या परीने सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात ताज आणि ओबेरॉयसारख्या हॉटेलना मोठे नुकसान सोसावे लागले होते. आता या हॉटेलनी अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. मजबूत भिंती उभारण्यापासून ते आजूबाजूचा परिसर हल्लेखोरांच्या रडारवर येऊ नये म्हणून अँटीक्रॅश बोलार्ड व्यवस्था तयार करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तपासणी यंत्रणा, २४ तास नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या सर्वांचे कंत्राट इस्त्रायलच्या एलगो या कंपनीला देण्यात आले आहे. मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीलाही कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली असून मेटल डिटेक्टर, टक्करविरोधी भिंती उभारण्यात आल्या आहे. ही सुरक्षा व्यवस्थादेखील इस्त्रायलच्या बीजी इल्यानिट कंपनीने पुरवली आहे. याठिकाणी अत्याधुनिक जीपसह पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त २४ तास तैनात असतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट या अत्यंत महत्वाच्या स्थानकांवर कोणतेही हत्यार ओळखणारी मेटल डिटेक्टर व्यवस्था बसवण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशावर या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने कारवाई केली जाते. प्रवाशांकडे असलेल्या सामानाची देखील दोन दोन ठिकाणी तपासणी करणारे स्कॅनर बसवण्यात आले आहे. एखादी धोकादायक वस्तू आढळल्यास तात्काळ अलार्म वाजतो आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा त्याठिकाणी तातडीने हजर होते.
मुंबई उच्च न्यायालय, महत्वाची रेल्वेस्थानके, गेटवे ऑफ इंडिया, कुलाबा येथील पोलीस मुख्यालय, क्रॉफर्ड मार्केट मधील मुंबई पोलीस आयुक्तालय येथे सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. याठिकाणी वाळूची पोती, बॅरिकेड्स, संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणच्या खासगी आस्थापनांच्या ठिकाणी असलेली सुरक्षा व्यवस्था थेट पोलिसांशी संपर्कात असते. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यापूर्वी मुंबई पोलीस स्वतंत्रपणे शहराची सुरक्षा व्यवस्था सांभाळत होते. मात्र या हल्ल्यानंतर लष्कर, नौदल आणि हवाई दलाशी समन्वय साधून संयुक्त कारवाई करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली. दक्षिण मुंबईतील नौदलाच्या लॉयन गेटवर तर हिंदी आणि इंग्रजीमध्ये हल्लेखोरांना इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत. ही सुरक्षा यंत्रणा भेदण्याचा प्रयत्न केल्यास थेट गोळ्या घातल्या जातील, असा इशारा या फलकामधून देण्यात आला आहे. समाज माध्यमाच्या या युगात काय खबरदारी घ्यावी याचे प्रशिक्षण सुरक्षा यंत्रणांना वेळोवेळी देण्यात येत आहे. त्यातून जनतेचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना सतर्क करणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मुंबईत सर्वत्र गस्त घालण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे. हल्ला झालाच तर नागरिकांनी काय करावे याचेही प्रशिक्षण वेळोवेळी देण्यात येत आहे. अनोळखी वस्तूला हात न लावता त्याबाबत संबंधितांना कळवण्याची जागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे पोलिसांना मोठी मदत होत आहे.