राज्यात महायुती सरकार आल्याने नाशिक-पुणे रेल्वेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. file photo
Published on
:
26 Nov 2024, 4:07 am
Updated on
:
26 Nov 2024, 4:07 am
नाशिक : राज्यात महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाची केंद्रस्तरावरून घोषणा होताना निधीचीही तरतूद केली जाईल, अशी शक्यता आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुतीच्या पारड्यात कौल दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये नवे सरकार स्थापन हाेणार आहे. मात्र, नव्या सरकारपुढे राज्यातील रखडलेले प्रकल्प, विकासकामे व पायाभूत सुविधांच्या उभारणीचे आव्हान असणार आहे. अशाच रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत.
-२३२ किलोमीटरचा दुहेरी रेल्वेमार्ग
-प्रकल्पासाठी अंदाजे १६ हजार कोटींचा खर्च
-कृषी, औद्योगिक विकासाला चालना
-नाशिक-पुण्यातील प्रवासाची वेळ पावणेदोन तासांवर येणार
नाशिक- नगर- पुणे या तीन जिल्ह्यांच्या विकासात भर पाडणाऱ्या २३२ किलोमीटरच्या सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे. या रेल्वेमुळे तीन्ही जिल्ह्यांमधील कृषी व औद्योगीक विकासालादेखील चालना मिळणार आहे. मात्र, चालू वर्षाच्या प्रारंभी प्रस्तावित नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-पुणे या मार्गात बदल करण्याचा घाट राज्य सरकारकडून घालण्यात आला होता. तसेच नव्याने नाशिक- सिन्नर- शिर्डी- पुणे असा हा मार्ग नेण्याची तयारी शासनाने केली. मात्र, शासनाच्या या निर्णयावर तीन्ही जिल्ह्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत हाेता. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला गती देण्याचे घोषणा केली. तसेच पहिलेचाच नाशिक-संगमेनर-पुणे असा मार्ग ठेवण्याचे आश्वासनही दिले होते. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन हाेणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सेमी हायस्पीड रेल्वेबाबत दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्ती करावी, अशी अपेक्षा तीन्ही जिल्ह्यांमधील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
बहुचर्चित नाशिक- पुणे रेल्वे मार्गामध्ये राजकीयदृष्ट्या संगमनेर अडचणी ठरत होते. प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे संगमनेरच्या सर्वांगिण विकासात झपाट्याने वाढ होणार आहे. त्याचे श्रेय विरोधकांच्या पारड्यात जाण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे शासनाने प्रस्तावित मार्गात बदल करण्याचा घाट घातल्याची चर्चा होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत संगमेनरवासीयांनीच बदल घडविला आहे. परिणामी, केंद्र व राज्य सरकारकडून प्रकल्पाला तातडीने मंजूरी देतानाच निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता बळावली आहे.