Published on
:
23 Jan 2025, 11:55 am
Updated on
:
23 Jan 2025, 11:55 am
शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : पोहेगाव (ता. कोपरगाव) येथे मंगळवारी (दि. 21) सायंकाळी सहाच्या सुमारास माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकणार्या तीन चोरट्यांविरुद्ध आज शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, या दरोडेखोरांना मारहाण केल्याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माळवे सराफ दुकानाचे संचालक ज्ञानेश्वर माधवराव माळवे (वय 52, रा. कोळगाव थडी, कोपरगाव) यांनी चोरांच्या विरुद्ध याबाबत फिर्याद दिली.
माळवे यांनी दिलेल्या फिर्यादीचा आशय असा, की सायंकाळी दुकानात आलेल्या ग्राहकाच्या लहान बाळाचे कान टोचत होतो, त्या वेळी मुलगा संकेतही तेथे होता. त्या वेळी दुकानात आलेल्या तीन दरोडेखोरांनी तलवार, बंदूक व कोयता दाखवून आम्हाला गप्प बसण्यास सांगितले व सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत भरले. दरोडेखोर जात असताना एकाला मी पकडले. त्याने दोनदा तलवारीने माझ्यावर वार केला आणि पळू लागले. माझा मुलगा संकेत यानेही एका दरोडेखोराला पकडले. त्यानेदेखील माझ्या मुलावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला त्या झटापटीत ते पिशवी सोडून पळून गेले. जाताना त्यांनी दगडफेक केली त्यात दुकानाचे नुकसान झाले. त्या वेळी जमलेल्या जमावाने दोन दरोडेखोरांना पकडून मारहाण केली. शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भारत बलैया तपास करीत आहेत.
चोरांना मारहाण केल्याचा गुन्हा
दरम्यान, सराफ व्यावसायिक ज्ञानेश्वर माधवराव माळवे यांच्या दुकानात चोरींचा प्रयत्न करून पळून जात असलेल्या दोघांना पकडून जमावाने मंगळवारी बेदम मारहाण केल्याचा गुन्हा शिर्डी पोलिसांनी दाखल केला आहे. त्यात म्हटल आहे, की पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने, निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पोहेगावला घटनास्थळी भेट दिली, तेव्हा जमावाच्या मारहाणीत जखमी झालेले दोघे जण (आदित्य बागूल व फराज शेख) पडलेले होते. चोरी करून पळून जाताना त्यांना पकडण्यात आले, त्या वेळी रस्त्याने येणार्या जाणार्या 10 ते 15 लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून दोघांना लाथाबुक्क्यांनी, कसल्या तरी साहित्याने आणि दगड फेकून मारहाण केली. यात हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी विजय धनेधर यांनी ही फिर्याद दिली. दरम्यान, मारहाण करणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पोहेगाव ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.