दावे - प्रतिदाव्यांना चढलाय जोर Pudhari File Photo
Published on
:
21 Nov 2024, 11:38 pm
Updated on
:
21 Nov 2024, 11:38 pm
चल यार, सोड ना ती दुश्मनी! निवडणुका पार पडल्या ना? मी आमच्या साहेबाकडून कार्यकर्ता होतो आणि तू विरोधी पार्टीत होतास. टफ फाईट झाली. कोण निवडून येणार, हे ज्याचे त्याचे नशीब आहे. आता आपली जुनी दोस्ती कायम. काय म्हणतोस?
शंभर टक्के बरोबर आहे; पण आमचे साहेब निवडून कसे येणार, याचं राईट कॅल्क्युलेशन सांगतो भावा तुला.
सांग, सांग. तुझी हौस होऊ दे. मला तर वाटते आमचे साहेब येणार.
पहिले एक लक्षात घे. म्हणजे पाहा, आमचे साहेब एका समाजाचे नेते आहेत. त्या समाजाचा बुलंद आवाज आपल्या जिल्ह्यात कुणाचा असेल, तर तो आमच्या साहेबांचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, साहेब राष्ट्रीय पक्षाकडून उभे आहेत. प्रत्येक पक्षाचा आपला एक मतदार असतो. काँग्रेस असो का भाजप असो का मग राष्ट्रवादी असो, काही मतदार असे असतात की निवडणूक ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणतीही असली, तरी आपापल्या पक्षाला मतदान करत असतात. आपल्या मतदारसंघात निवडून यायला लागतात अंदाजे एक लाख मते. त्याच्यातील समाजाचे आमचे सत्तर हजार मतदान फिक्स आहे. राष्ट्रीय पक्षाचे परंपरागत मतदार वीस हजार आम्हालाच मतदान करणार आहेत. दहा हजार मतदान साहेबांच्या स्वच्छ चारित्र्याचे आणि निर्मळ कारभाराचे आहे. पाच हजार मतदान आम्ही मॅनेज केलेले आहे. अंदाजे दोन हजार मतदान आमच्या पक्षाला चुकून पडणार आहे. काही बावळे लोक मतदानाला येतात आणि घाई गडबडीत काही न बघता कोणते तरी बटन दाबतात आणि निघून जातात. ज्याने काही प्रचार केला नाही त्यालासुद्धा चार पाचशे मतं मिळतात की नाही? तशी काही मतं आमच्या साहेबांना मिळून आमची शिट अल्हाद निघून जाईल, असा मला विश्वास आहे.
काही पण अंदाज सांगू नकोस. आम्ही पण मतदारसंघात फिरत होतो. वारं पूर्ण फिरलंय.
ते सोड. वारं आम्हीच फिरवलंय. आमच्या साहेबांनी तुमच्या उमेदवाराची मते खाण्यासाठी ऑलरेडी दोन त्यांच्या जातीचे उमेदवार फंडिंग करून उभे केले आहेत. ते त्यांच्या जातीची मते खातील. आमच्या साहेबांचा मतदारसंघातला संपर्क तगडा आहे आणि देशपातळीवरचे मोठे-मोठे नेते येऊन सभा घेऊन गेलेले आहेत. त्यांच्या बोलण्याचा काही फरक पडणार आहे का नाही?
सांगतो... आमचे साहेब पंचाहत्तर हजार मतं घेणार. तुमचे साहेब पन्नास हजार मते घेणार. आम्ही उभे केलेले दोन डमी उमेदवार तुमची मते खाणार आणि आमचे साहेब 25 हजार मतांनी निवडून येणार. साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे. तुला लक्षात कसे येत नाही तेच म्हणतो मी? आमचे साहेब आमदार झाले की, डायरेक्ट कॅबिनेट मंत्री होणार. साहेब मिनिष्टर झाले की, आपली गुत्तेदारी पुन्हा जोमात चालणार. जाऊ दे, कोण निवडून यायचे ते येऊ देत. निवडणुकीपुरते आम्ही त्यांचे कार्यकर्ते असतो. सतरंज्या उचलण्याचेच काम आपण आतापर्यंत केले. एक मात्र खरे, यावेळी निवडणूक ऐतिहासिक आणि चुरशीची आहे, हे नक्की! कोण निवडून येणार याचा अंदाज मात्र वर्तवणे मात्र खूपच अवघड आहे. बहुतांश लढती दुरंगी असल्याने निवडणुकीला चांगला रंग चढला आहे बघू, चल मग...