दावोस : येथील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित उद्योेगमंत्री उदय सामंत.pudhari photo
Published on
:
24 Jan 2025, 1:10 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:10 am
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यासाठी मोठी गुंतवणूक आणली असतानाच, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 40 हजार 937 कोटींच्या संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील गुंतवणूक सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला वेग येणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने पावले उचलली आहेत. त्यामुळे जवळपास 36 हजारांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे अप्रत्यक्ष होणारी रोजगार निर्मिती वेगळी असणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार संघात दोन नवे उद्योग आणून येथील तरुणांच्या हाती रोजगार देत होणारे स्थलांतर थांबावे, म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. मतदार संघातील व जिल्ह्यातील उच्च शिक्षित याच ठिकाणी राहिल्यास येथील विकासालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रकल्प आणण्यासाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या होत्या. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि व्हीआयटी सेमीकॉन्स या सेमीकंडक्टर क्षेत्रातील या कंपन्यांच्या वरिष्ठांना यासाठी मनवण्यात यश मिळवले होते. नव्या सरकारमध्येही उद्योग खात्याची धुरा सांभाळणार्या ना. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही कंपन्यांशी गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करुन एक पाऊल पुढे टाकले आहे.
राज्यासाठी दोन दिवसात 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या 53 सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या आहेत. मागील अनेक वर्षापासूनच रोजगारक्षम प्रकल्पाचा बॅकलॉग यामुळे भरुन निघणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात दोन्ही प्रकल्प होणार असल्यामुळे जिल्ह्यातील उच्चशिक्षित तरुणाईला मोठी संधी निर्माण झाली आहे. पुढील तीन-चार वर्षात या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासासह रत्नागिरी शहर व ग्रामीण भागाच्या विकासाला मोठे योगदान मिळणार आहे.
रिळ-उंडीमध्ये होणार प्रकल्प..
व्हीआयटी सेमीकॉन्समध्ये 33 हजार 500 रोजगार उपलब्ध होणार असून, हा प्रकल्प रत्नागिरी शहरालगत आणि रिळ-उंडीमध्ये होणार आहे. संरक्षण रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या संरक्षण प्रकल्पासाठी लवकरच जागेची निश्चिती केली जाणार आहे. दोन्ही प्रकल्प हे प्रदूषण विरहीत असल्याने, रत्नागिरीच्या निसर्गाची हानीही टळणार आहे.